

श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा: येथील खरसई धरण गेली चार वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खरसई धरण प्रकल्पातून तोंडसुरे परिसरातील आठ गावे व चार वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर झाली.
मात्र, सुमारे तीन वर्षे उलटूनही ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. योजनेचे ७० ते ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असताना आर्थिक आणि प्रशासकीय कारणांमुळे काम रखडल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. यावर संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ तोंडसुरे नळपाणी योजनेच्या दिरंगाईपुरते पाहणे पुरेसे आहे का? ज्या खरसई धरणातून तोंडसुरे योजनेला पाणी मिळणार आहे, त्या धरणाचे काम गेल्या चार दशकांपासून पूर्ण का झाले नाही, हा त्याहून मोठा प्रश्न आहे.
खरसई धरणाचे काम सन १९८२ पासून प्रलंबित असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. धरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी दोन्ही बाजूंच्या कालव्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एवढा मोठा कालावधी उलटूनही धरणाचा अपेक्षित उपयोग पूर्ण क्षमतेने का होत नाही, याचे उत्तर शासनाच्या संबंधित यंत्रणांनी देणे आवश्यक आहे.
एका बाजूला तोंडसुरे नळपाणी योजनेला विलंब झाल्याबद्दल संबंधितांवर कारवाईचीचे संकेत दिले आहेत. सीबीआय चौकशीची शक्यताही बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. मग दुसऱ्या बाजूला १९८२ पासून अपूर्ण असलेल्या खरसई धरणाच्या कामासाठी जबाबदार कोण, याची चौकशी कधी होणार? असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
खरसई धरणासाठी आतापर्यंत किती निधी मंजूर झाला? किती निधी खर्च झाला? धरणाचे काम कोणत्या कारणामुळे रखडले? कालव्यांची कामे का पूर्ण झाली नाहीत? काम रखडण्यास कोणते अधिकारी, कंत्राटदार किंवा प्रशासकीय निर्णय कारणीभूत ठरले? तसेच धरणाची अधिकृत जलसाठा क्षमता किती आहे? या प्रश्नांची उत्तरे आजही जनतेला स्पष्टपणे मिळालेली नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, खरसई धरणाच्या जलाशयातील पाणी साठवण क्षमतेची अधिकृत नोंद शासनाच्या कोणत्या अभिलेखात आहे, याचीही माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खरसई धरणाचा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नाही. धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास त्याच्या जलस्रोताचा उपयोग तोंडसुरे योजनेसह म्हसळा तालुक्यातील इतर पाणीपुरवठा योजनांसाठी करता येऊ शकतो, त्यामुळे खरसई धरणाचे उर्वरित काम पूर्ण करून त्याची जलसाठा क्षमता अधिकृतपणे निश्चित करावी आणि तालुक्यातील भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन या जलस्रोताच्या आधारे करावे, अशी मागणी पुढे आली आहे.
तोंडसुरे योजनेच्या दिरंगाईवरून अधिकारी आणि कंत्राटदारांच्या जबाबदारीचा प्रश्न उपस्थित होत आहे. पण त्याचवेळी १९८२ पासून खरसई धरणाच्या अपूर्ण कामाची जबाबदारी कोणाची? हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.
एका योजनेला तीन वर्षांचा विलंब आणि एका धरणाला चार दशकांची प्रतीक्षा... म्हसळा तालुक्यातील पाणीप्रश्नाची ही विसंगती आता शासनाच्या दृष्टीने गांभीर्याने तपासण्याची वेळ आली आहे.
तीन वर्षे रखडलेल्या तोंडसुरे योजनेसाठी जबाबदार व्यक्तींची चौकशी केली जाणार असेल, तर चार दशकांपासून रखडलेल्या खरसई धरणाची जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे. धरणाचे काम पूर्ण न होण्यामागे नेमके कोण जबाबदार आहेत, हे जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी आहे. केवळ दोषारोप करून प्रश्न सुटणार नाही. चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच खरसई धरणाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे.
- निलेश मांदाडकर, ग्रामस्थ, खरसई, ता.म्हसळा