ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके ऑनलाइन एकात्मिक प्रणालीद्वारे डिजिटल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या उपक्रमामुळे आता कर्मचाऱ्यांची संपूर्ण सेवा माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत तब्बल तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके डिजिटल करण्यात आली असून, उर्वरित प्रक्रियाही सुरू आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या 17 विभाग आणि पाच पंचायत समित्यामध्ये 4 हजार 522 अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्ययावत नसल्यामुळे पदोन्नती, बदली, रजा आणि सेवाविषयक लाभांच्या प्रक्रियेत अनेकदा विलंब होत असे. मात्र, या डिजिटल उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांची वैयक्तिक सेवा माहिती सुरक्षितपणे संग्रहीत होणार असून, सर्व नोंदी एकाच ठिकाणी तत्काळ उपलब्ध राहणार आहेत. परिणामी कामकाजाचा वेग वाढून प्रशासनिक पारदर्शकता अधिक बळकट होईल.
या प्रणालीद्वारे प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःचे लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कुठूनही आणि कधीही स्वतःची माहिती पाहण्याची सुविधा मिळणार आहे. वार्षिक गोपनीय अहवाल, पदोन्नती, प्रशिक्षण, रजा अशा सर्व नोंदी ऑनलाइन अद्ययावत करता येणार असल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘कागदविरहित’ कामकाजाच्या उद्दिष्टाकडे मोठे पाऊल टाकले गेले आहे.
डिजिटल प्रणालीचे प्रमुख फायदे
प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक सेवा माहिती सुरक्षितपणे जतन
पदोन्नती, बदली, रजा आणि प्रशिक्षण नोंदी तत्काळ अपडेट
वार्षिक गोपनीय अहवालांचे ऑनलाइन मूल्यांकन आणि संग्रह
कागदविरहित कार्यालयीन कामकाजाला चालना
कुठूनही लॉगिन करून माहिती पाहण्याची सुविधा
एकात्मिक प्रणालीद्वारे सेवा पुस्तके डिजिटल केल्याने केवळ प्रक्रिया जलद झाली नाही, तर कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास आणि पारदर्शकता वाढली आहे. स्वतःचे लॉगिन मिळाल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कुठूनही माहिती पाहता येत असल्याने कामकाज अधिक सुलभ झाले आहे.अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे