

ठाणे : ठाणे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व एका खासगी इसमास ठाणे एसीबी पथकाने 35 हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी गुरुवारी दुपारी सापळा कारवाई करून अटक केली. दीपक मधूकरराव इसळ (वय-34, वरिष्ठ लिपिक, सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे) आणि अजित विठ्ठल कोकमकर (वय-50, खाजगी इसम) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
या घटनेतील तक्रारदार यांच्या आईने 1987 साली भाईंदर येथे एक गाळा विकत घेतला होता. दरम्यान, 2008 साली शासनाने सुरू केलेल्या अभय योजना 2008 अंतर्गत अनधिकृत मालमत्ता शासकीय शुल्क व दंड भरून अधिकृत करून घेण्यासाठी तक्रारदार यांच्या आईने 2009 साली गाळ्याचे मूळ खरेदीखत ठाणे सह निबंधक कार्यालयात जमा केले होते. हे खरेदीखत परत मिळण्यासाठी तक्रारदार हे ठाणे सह निबंधक कार्यालयात गेले असता सदरचे कामकाज पाहणारे लिपिक दीपक इसळ यांनी तक्रारदार यांना कोकमकर नामक खाजगी इसमास भेटण्यास सांगितले.
6 ऑक्टोबर 2025 रोजी खाजगी इसम कोकमकर याने तक्रारदार यांना मूळ खरेदी खत परत मिळण्यासाठी लागणारे कागदपत्र एका कागदावर लिहून दिले. तसेच त्याच वेळी सदर कागदावर खाजगी इसमाने 35 हजार आणि 35 हजार असे दोन वेळा लिहून देत खरेदी खत हवे असल्यास 70 हजार रुपये एकूण लागतील असे तक्रारदार यांना सांगितले.
या प्रकरणी तक्रारदार यांनी 28 ऑक्टोबर रोजी ठाणे एसीबी पथक कार्यालयात फिर्याद दाखल केली होती. एसीबी पथकाने या घटनेची पडताळणी केली असता सदर लिपिकाने 70 हजाराच्या लाचेत 5 हजार कमी करून 65 हजार रुपये दोन टप्प्यात मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी दुपारी सापळा रचून एसीबी पथकाने सदर लिपिकाचा साथीदार असलेल्या खाजगी इसमास तक्रारदार यांच्याकडून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याच्याच कार्यालयात रंगेहाथ पकडले. त्यानंतर एसीबी पथकाने लिपिक दीपक इसळ यास देखील अटक करण्यात आली. या प्रकरणी एसीबी ठाणे पथक अधिक चौकशी करीत आहेत.