डोंबिवली : नवरात्रौत्सवाच्या अष्टमीला होम कुंडात तुपाची आहुती देत असताना ओढणीने पेट घेतल्याने डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या टिळकनगर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय भाविक महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही महिला पूजेसाठी बसली असताना ओढणीने पेट घेतल्याने गंभीररित्या भाजली होती.
ओढणी पेटल्यानंतर या महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यात गंभीररित्या होरपळलेल्या सदर महिलेचा एका खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत असतानाच मृत्यू झाला. भाविक महिलेच्या मृत्युने टिळकनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सरिता निरंजन ढाका (३३) असे मृत महिलेचे नाव असून ती पती निरंजन इंदरलाल ढाका (३६) यांच्यासह टिळकनगरमधील शिव पॅराडाईज इमारतीत राहत होती. या मृत्यूप्रकरणी सरिता यांच्या पतीने दिलेल्या माहितीवरून टिळकनगर पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निरंजन आणि सरिता ढाका राहत असलेल्या परिसरात नवरात्रौत्सव सुरू होता. सात दिवसांसाठी बसविलेले घट आणि देवीची पूजा केल्यानंतर नवरात्रौत्सवातील आठव्या दिवशी अष्टमीला देवीला होम हवन केले जाते. साग्रसंगीत नैवद्य दाखविला जातो. या होम/हवन पूजेसाठी सरिता ढाका बसल्या होत्या. यज्ञकुंड धगधगण्यासाठी होमामध्ये समिधा, शेण गोवऱ्यांसह त्यावर तूप टाकले जात होते.
होमाच्या बाजूला पुजेसाठी बसल्यावर सरिता ढाका यांनी देवीचा मान राखण्यासाठी गळ्यातील ओढणी डोक्यावर घेतली होती. होमातील शेण गोवऱ्या तूप टाकल्यामुळे धगधगत होत्या. सरिता यांनी उठून होम कुंडामध्ये चमच्याने तूपाची धार टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेटलेल्या शेण गोवऱ्या तूपाच्या धारेमुळे धगधगून पेटल्या आणि त्यांच्या ज्वाळा वरच्या दिशेने येऊन सरिताच्या ओढणीने पेट घेतला.