

उरणः मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाने न्हावा शेवा बंदरात मोठी कारवाई करत सुमारे २० मेट्रिक टन वजनाचा चिनी फटाक्यांचा साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या फटाक्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ६.३२ कोटी रुपये आहे. हे फटाके 'लेगिंग्ज' म्हणून चुकीची माहिती देऊन भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, अशी माहिती डी.आर.आय.च्या अधिकाऱ्यांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या कंटेनरची तपासणी केली असता, अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, कंटेनरमध्ये फक्त दर्शनी भागात लेगिंग्जचा एक पातळ थर ठेवण्यात आला होता, जेणेकरून खरा माल लपवता येईल. प्रत्यक्षात कंटेनरचा ९५% भाग चिनी बनावटीच्या फटाक्यांनी, आतषबाजीच्या वस्तूंनी भरलेला होता. या कंटेनरमधून एकूण ६०,००० फटाक्यांचे, आतषबाजीचे नग जप्त करण्यात आले, जे सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले आहेत.
मागील काही काळात 'ऑपरेशन फायर ट्रेल' या सांकेतिक नावाने मोठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत न्हावा शेवा बंदर, मुंद्रा बंदर आणि कांडला सेझ येथे सात कंटेनरमधून सुमारे १०० मेट्रिक टन फटाके जप्त केले होते, ज्यांची किंमत अंदाजे ३५ कोटी रुपये होती. फटाक्यांची आयात ही परकीय व्यापार धोरणांतर्गत 'प्रतिबंधित' आहे आणि यासाठी 'डीजीएफटी' तसेच स्फोटक नियम २००८ अंतर्गत 'पेसो' कडून परवाना घेणे बंधनकारक असते.
हे फटाके सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि बंदर पायाभूत सुविधांसाठी धोकादायक आहेत, ज्यामुळे ते पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठीही धोकादायक ठरतात. डी. आर.आय.चे अधिकारी म्हणाले की, अशा धोकादायक मालाला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी, अवैध जाळे शोधून काढणे, मोडून काढणे यासाठी डी. आर. आय. कटिबद्ध असल्याचे सुचित केलेले आहे.