Murbad Road Project pudhari photo
ठाणे

Murbad Road Project : पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाचे ‘बिंग’ उघडे

नागाचा खडक येथे साकवावर पाणी तुंबले, जीवघेण्या डिझाइर्नवर संताप, यंत्रणांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

मुरबाड शहरातील नागाचा खडक परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील कोट्यवधी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाच्या कामातील त्रुटी आता पहिल्याच पावसात उघड होऊ लागल्या असून, संबंधित ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या यंत्रणांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडवणे, पारंपरिक विहीर नष्ट होणे आणि जलनिस्सारण व्यवस्थेत संशयास्पद बदल झाल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता पहिल्याच जोरदार पावसात काँक्रीट साकावाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे.

प्रत्यक्ष परिस्थितीत या साकावावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने अचानक साचलेल्या पाण्यात शिरत आहेत. वेगात असताना चालकांना रस्त्यावरील पाण्याची खोली किंवा स्थितीचा अचूक अंदाज येत नसल्याने वाहनांचे संतुलन बिघडण्याचा गंभीर धोका निर्माण होत आहे.

अचानक टायरखाली पाण्याचा जोरदार फटका बसत असल्याने चालक क्षणभर गांगरून जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. याहून गंभीर बाब म्हणजे वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे उडणारे पाणी दुचाकीस्वारांवर उडत आहे.

विविध प्रश्न उपस्थित

शेकडो कोटी रुपयांचा महामार्ग प्रकल्प उभारताना रस्त्याचे संरेखन, समतलता, उतार व्यवस्था आणि जलनिस्सारण यांचे तांत्रिक मापदंड नेमके तपासले गेले होते का? की काम पूर्ण दाखवण्याच्या घाईत दर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात जर अशा प्रकारे रस्त्यावर पाणी साचत असेल तर भविष्यात मुसळधार पावसात या रस्त्याची स्थिती काय होणार? आणि सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

चौकशी करण्याची मागणी

विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वी नैसर्गिक नाल्याची रचना बदलण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आता त्याच भागात पाणीसाठा निर्माण होत असल्याने संपूर्ण डिझाइन प्रक्रियेबाबत संशय अधिक गडद झाला आहे. स्थानिक नागरिकांकडून आता संबंधित महामार्ग प्रकल्पाचे स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण, रस्त्याच्या संरेखनाची तपासणी, जलनिस्सारण रचनेचे परीक्षण आणि संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT