Mira Bhayandar Metro pudhari photo
ठाणे

Mira Bhayandar Metro : मिरा भाईंदर मेट्रो लोकार्पणाचा मुहूर्त हुकला

3 एप्रिल ऐवजी 6 एप्रिल रोजी लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिलेला दहिसर-मिरा भाईंदरच्या मेट्रोचा लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आता 3 एप्रिल ऐवजी 6 एप्रिल रोजी लोकार्पण सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाची तारीख उपमुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो लोकार्पणाचा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून मेट्रो सुरू होण्याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी 2025 मध्ये गणपतीला मेट्रो सुरू होणार, असे सांगितले त्यानंतर पुन्हा दिवाळीला सुरू होणार, त्यानंतर पुन्हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार, अशी आश्वासने देण्यात येत होती.

दरम्यान आता 3 एप्रिलचा मुहूर्त ठरला होता, आता तोही मुहूर्त टळला असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता 6 एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्याची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

दहिसर मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9 मधील दहिसर ते काशिगावपर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या 3 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेट्रोचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आला होता. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमेत्रा पवार या देखील उपस्थित राहणार होत्या. शहरात त्यानुसार शिवसेना भाजपने मेट्रो मॅन म्हणून जाहिरात फलक लावले होते. यासंदर्भात आ. नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीरपणे ही माहिती दिली आहे.

तीन दिवसांची प्रतीक्षा

उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे काम असल्याने तसेच इतर काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मेट्रो प्रवासाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता आणखी तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT