Dahisar Kashigaon Metro Pudhari
ठाणे

Dahisar Kashigaon Metro: दहिसर ते काशिगाव प्रवास आता 30 मिनिटांत; ठाण्यातील पहिल्या मेट्रोने मिरा-भाईंदरचा चेहरा बदलणार

Dahisar Kashigaon Metro travel time: विकासाला मिळणार नवी दिशा

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर: ठाणे जिल्ह्यातील दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प 9 अंतर्गत दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यानच्या पहिल्या मेट्रो मार्गाचे लोकार्पण मंगळवारी 7 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी या मार्गादरम्यानच्या 1 तासाहून अधिक तासाच्या प्रवासाला लागणारा वेळ या मेट्रो मार्गामुळे 30 मिनिटांवर आल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. वाहतुकीतील या सुधारणेमुळे मिरा-भाईंदरमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होऊन विद्यार्थ्यांसाठी व चाकरमान्यांसाठी हा मेट्रो मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

दहिसर ते काशिगाव दरम्यानच्या 4.7 किमी अंतराच्या मार्गादरम्यान दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव व काशिगाव अशी चार स्थानके असल्याचे त्यांनी सांगितले. या मेट्रोमुळे मिरा-भाईंदर शहर मुंबईला जोडले असून दहिसर ते भाईंदर या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन 2018 मध्ये आपण केल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे ट्रायल रन देखील आपण उपमुख्यमंत्र्यांसोबत केल्याची आठवण त्यांनी करून दिली. विशेषतः ही मेट्रो, मेट्रो प्रकल्प 7 ला जोडली गेली असून पुढे ती मेट्रो प्रकल्प 3 ला जोडली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील काशिगाव ते भाईंदर पश्चिमेकडील मेट्रोचे 96 टक्के काम पूर्ण झाले असून त्याचेही लोकार्पण याच वर्षी करण्यात येईल, असे भाकीत त्यांनी केले. या 4.3 किमी अंतराच्या मेट्रो मार्गावर साईबाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगत सिंह उद्यान व नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ही चार स्थानके आहेत.

यासाठी जवळपास 6 हजार 607 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या मेट्रोमुळे कुलाबापर्यंत सिमलेस कनेक्टिव्हीटी पुढील काळात तयार होणार आहे. मेट्रोचे तिकीट कॅशलेस, स्मार्ट कार्ड व कार्ड वनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यासाठी 80 टक्के व्यवहार कॅशलेसच्या माध्यमातून केला जात असून केवळ 20 टक्के व्यवहार रोखीने केले जात आहेत. मेट्रो प्रकल्पांमध्ये सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लाइटिंग व रिजनरेटिंग ब्रेकिंगमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून गणला जाणार आहे.

मेट्रो व कोस्टल रोडमुळे पश्चिम महामार्गावरील वाहतुकीचे मोठ्याप्रमाणात नियोजन होणार आहे. ऑपरेशनल मेट्रोमुळे दिल्लीनंतर मुंबई देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. एमएमआर क्षेत्रातील मेट्रो 100 किमी पेक्षा जास्त अंतरावरील ऑपरेशनल मेट्रो ठरली असून येत्या दोन वर्षांमध्ये अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होणार असल्याने भविष्यात मुंबई देशात पहिली ठरणार आहे.

एमएमआर क्षेत्रात संपूर्ण सिमलेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम तयार करण्यात येत असून त्याला फिडर म्हणून सर्व बसेस या ई-बसेस किंवा अल्टरनेट फ्युएल बसेस रस्त्यावर आणण्यात येणार आहेत. त्याचे नेटवर्क तयार करण्यात येत आहे. वॉटर ट्रान्स्पोर्टेशनचे काम देखील सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर सुगमतेच्या दृष्टीने मुंबई हे शहर सुगम शहर म्हणून ओळखले जाणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोमुळे मुंबई आणि एमएमआर क्षेत्र जोडले गेल्याचा आनंद असून पुढील गायमुख ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे लोकांना कुलाबापासून ते कल्याण, नवी मुंबई, तळोजापर्यंत प्रवास करता येणार असून भविष्यात मेट्रोचे जाळे 337 किमीपर्यंत पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प जगात पहिल्या क्रमांकाचा प्रकल्प ठरणार आहे. यामुळे वेळेची बचत होऊन प्रदूषण मोठ्याप्रमाणात कमी होईल, असा दावा त्यांनी केला.

सेव्हन इलेव्हन कंपनीच्या जागेबाबत चर्चा

पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे लोकार्पण दहिसर मेट्रो स्थानकावर करण्यात आले. येथील मेट्रोला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्याच मेट्रोने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आ. नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, एमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी आदींनी प्रवास करून काशिगाव मेट्रो स्थानक गाठले.

या प्रवासादरम्यान मेट्रोच्या कामात अडथळा ठरलेल्या आ. मेहता यांच्या मेसर्स सेव्हन इलेव्हन कंपनीच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच इतर तांत्रिक बाबींवर देखील चर्चा करण्यात आली. तद्नंतर काशिगाव मेट्रो स्थानकावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

दहिसर ते काशिगाव मेट्रो रेड लाईन म्हणून ओळखली जाणार दहिसर ते काशिगाव दरम्यानची मेट्रो रेड लाईन ओळखली जाणार असून ही मेट्रो काशिगावपर्यंत विस्तारल्यामुळे प्रवाशांना पश्चिम द्रुतगती महामार्गवरील दहिसर पूर्वपासून थेट अंधेरी पूर्व व पश्चिमपर्यंत प्रवास करता येणार आहे. परिमाणी दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊन रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार आहे.

वाहतुकीतील या सुधारणेमुळे मिरा-भाईंदरमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होऊन विद्यार्थ्यांसाठी व चाकरमान्यांसाठी हा मेट्रो मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे. हा मेट्रो मार्ग बस, ऑटोरिक्षा आणि इतर वाहतूक व्यवस्थेशी अखंडपणे जोडला जाणार असून प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून न राहता आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT