ठाणे : शुभम साळुंके
दही हंडीवरून ठाण्यात सुरु झालेल्या राजकारणाचे वादळ कल्याण डोंबिवली पर्यंत येऊन ठेपलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या ठाण्यातील दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर लावून विश्व विक्रमला गवसणी घातली होती. यानंतर ठाण्यात मोठं राजकारण सुरु झालं. या राजकारणावर मनसेचे नेते राजू पाटील यांनी ट्विट केलं. तर त्याला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे कि, कोण राजू पाटील ? माझे बाहेरचे पदाधिकारी कार्यकर्ते राजू पाटील नावाचे आहेत त्यापैकी कोण ? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला होता. त्यावर आगरी साहित्यिक सर्वेश तरे यांनी मंत्री सरनाईक यांना लक्ष केलं आहे. तरे यांनी आपल्या बोली आगरी भाषेतच उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, याचे ओवळा-माजीवडा मतदार संघान ‘एकच वादा’ बोलल्यावर लोकांच्या मुखातून ‘राजू दादा’ येतं, ना मोर्चांन आंगावं बाटली फेकल्या, मराठी लोकांनी हाकललेला आमदार बोलल्यावर ‘राजु पाटील’ कोण ?
दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात गोविंदा पथकांच्या विश्व विक्रमावरून मोठं राजकीय नाट्य रंगलं आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं विधान चर्चेत आलं होत. ते म्हणाले होते कि, कोणी काहीही म्हणू द्या, कोणाचीही युती होऊ द्या. काही गोविंदा पथकांना वाटत असतं की, आमचा विश्वविक्रम मोडणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत. पण कोकण नगर गोविंदा पथकाने दाखवलं की, विश्वविक्रम ही कोणा एकाची मक्तेदारी नसते. विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख जय जवान गोविंदा पथकाच्या दिशेने होता. जय जवान पथकानेही नऊ थरांचा विक्रम आपल्याच संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रचला होता, असेही प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते.
सरनाईक यांच्या विधानानंतर मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स पोस्ट करत सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं. राजू पाटील यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय की, मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना ‘जय जवान दहिहंडी पथक’ या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली. याचाच राग धरून काही भैय्यांची तळी उचलणारे गांडूळ वळवळले व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचा राजकारण केले. ठाण्यात एका गोविंदा पथकाने ‘त्यांच्या’ येथे पहिल्यांदा १० थर लावले, त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलेच पाहिजे. परंतु इथेही यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला. आज त्याच जय जवान गोविंदा पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा १० थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडूळांना माती दाखवली. जय जवान गोविंदा पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संस्कार व ‘संस्कृती’ ही वागण्यात असली पाहिजे……नुसत्या नावात काय आहे ? असं पाटील यांनी म्हटलं.
मनसे नेते राजू पाटील यांच्या एक्स पोस्ट नंतर माध्यमांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारला. यावेळी सरनाईक यांनी कोण राजू पाटील ? असं म्हटल्यावर आगरी साहित्यिक सर्वेश तरे यांनी दिलेलं उत्तर चांगलाच चर्चेत आलं आहे.
तरे यांनी आपल्या बोली आगरी भाषेतच उत्तर दिल आहे. ते म्हणाले कि, याचे ओवळा-माजीवडा मतदार संघान ‘एकच वादा’ बोलल्यावं लोखांचे तोंडून ‘राजू दादा’ येतंय , ना मोर्चांन आंगावं बाठली फेकलेल्या, मराठी लोखावी हाकललेला आमदार बोलतं ‘राजु पाटील’ कोण ? तरे यांनी खास आपला शैलीत सरनाईक यांचा समाचार घेतल्यानंतर त्यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
मात्र त्यावर सरनाईक गटाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.