Dahi Handi Accident Mumbai Pudhari
ठाणे

Dahi Handi Accident Mumbai: दहीहंडी उत्‍सवात विघ्न; महिलेसह राज्‍यात तिघांचा मृत्‍यू

पुण्‍यात महिलेचा, मुरबाडमध्ये तरुणाचा, मालाडमध्‍ये मुलाचा मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मुंबईसह राज्‍यात ढोल-ताशांच्या गजरात आणि गोविंदांच्या प्रचंड उत्साहात दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठिकठिकाणी ९ ते १० थरांच्या मानवी मनोऱ्यांची सलामी पाहायला मिळत असून उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मात्र, उत्सवाच्या या आनंदी वातावरणात महिला आणि तरुणासह एका मुलाचा मृत्यू झाला. तसेच मुंबईत दहीहंडी उत्सवात ३५ गोविंदा जखमी झाले आहेत.मालाड पश्चिमेकडील मार्वे रोडवरील चिकूवाडी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीत दहीहंडीची दोरी एका इमारतीच्या तळमजल्यावरील विटांच्या कच्च्या कॉलमला आणि एका झाडाला बांधण्यात आली होती.

मुले दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच दोरीच्या ताणामुळे विटांचा कॉलम अचानक कोसळला आणि त्याखाली सातवर्षीय रुद्र कदम हा मुलगा दबला गेला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पिपरी चिंचवड येथील जुनी सांगवी भागात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर डीजे साऊंडसाठी उभारण्यात आलेले ‘हँगिंग साऊंड’ उतरविताना त्याच्या लोखंडी अँगलसह साऊंड अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.

सलमा सलाउद्दीन पठाण (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. जुनी सांगवी येथील विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमस्थळी शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली; मात्र मृत महिलेच्या नातेवाईकांनी मंडळाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगत कारवाई करू नये,अशी विनंती केल्याने सांगवी पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मंडळच नोंदणीकृत नाही

विघ्नहर्ता दहीहंडी मंडळ नोंदणीकृत नसल्याची माहिती समोर आली आहे. हे मंडळ मागील काही वर्षांपासून दहीहंडी उत्सव साजरा करीत आहे. यंदाच्या कार्यक्रमासाठी मंडळाने सांगवी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी तब्बल ४१ अटी व शर्तींची नोटीस बजावून कार्यक्रमाला परवानगी दिली होती.

दहीहंडी तयारीदरम्यान मुरबाडमध्ये युवकाचा मृत्यू

मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका राजकीय पक्षातर्फे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या तयारीदरम्यान शुक्रवारी रात्री तयारीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून विवेक साईनाथ बिडवी या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवेक हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुंबईत ३५ गोविंदा जखमी

मुंबई महापालिका प्रशासनाने दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांची रुग्णालयातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण ३५ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी २८ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. चौघांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT