ठाणे

Dahanu to Talasari railway line : डहाणूच्या पुढे तलासरीपर्यंत रेल्वेचे विस्तारीकरण होणार

चौपदीकरणाचाही प्रस्ताव मंजूर; पालघर जिल्ह्यात विस्तारणार्‍या रेल्वेचा चौथ्या मुंबईला फायदा

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • विरार ते डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, पुढे तलासरीपर्यंत विस्तारीकरण

  • पालघर जिल्ह्यात विस्तारणार्‍या या रेल्वेचा चौथ्या मुंबईला फायदा होणार

  • वाढवण बंदराला जोडून होणारी चौथी मुंबई या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार

ठाणे : विरार ते डहाणू रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण आणि पुढे तलासरीपर्यंत विस्तारीकरण करण्यासाठी रेल्वेने नवा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प पुढील 10 वर्षात कार्यान्वित होईल असे सांगितले जात आहे. पालघर जिल्ह्यात विस्तारणार्‍या रेल्वेचा चौथ्या मुंबईला फायदा होणार आहे. वाढवण बंदराला जोडून होणारी चौथी मुंबई या बंदरामुळे आंतरराष्ट्रीय नकाशावर येणार आहे.

विरार ते डहाणू रोड दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर चौपदरीकरणाचा मोठा प्रकल्प मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुधारित क्षमतेसाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प-3 अंतर्गत राबविला जात आहे. या प्रकल्पासंबंधी 2018 आणि 2025 साली मिळालेल्या माहितीच्या अधिकारातील उत्तरांमध्ये उल्लेखनीय विसंगती दिसून येते. त्यानुसार जमीन संपादन डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तसेच मातीचे काम व पूल बांधकाम: डिसेंबर 2021 पर्यंत, रेल्वे ट्रॅक व स्थानक बांधणी: मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल असे नमूद करून जमिनीचे संपादन वेळेत पूर्ण झाल्यास प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी 5 वर्षाचा निश्चित केला होता. तसेच प्रकल्प उभारणीत टप्पे निश्चित करण्यात येऊन वेळेत पूर्तता अपेक्षित होती.

प्रकल्प एकच टप्प्यात

रेल्वेने 2025 मध्ये दिलेल्या उत्तरात प्रकल्पात विलंब झाल्याचे दिसून येत असून या भागातील प्रवाशांना धोक्याची घंटा वाजली आहे. 23 जुलै रोजी त्याच कार्यालयातून दिलेल्या उत्तरात चौपदरी -करण प्रकल्पासाठी कोणतेही टप्पे निश्चित करण्यात आलेले नाहीत, असे सांगण्यात आल्याने 2018मध्ये ज्या टप्प्यांची माहिती दिली, ती रेल्वेतर्फे नाकारण्यात आली. एका माहितीच्या आधिकारातील उत्तरात हा प्रकल्प एकच टप्प्यात पूर्ण केला जाणार असल्याचे सांगितले असून प्रशासनाच्या अंमल बजावणीतील बदल स्पष्ट झाल्याचे दिसून येते.

ठोस तारीख जाहीर नाही...

हा चौपदरीकरण प्रकल्प जून 2027 मध्ये पूर्ण होण्याची संभाव्य तारीख उत्तरांमध्ये नमूद करण्यात आल्याने यापूर्वी ठरवलेल्या पाच वर्षांच्या ऐवजी आता किमान 10 वर्षे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र उभारलेल्या प्रकल्पाची चाचणी व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी कोणतीही ठोस तारीख अजूनही जाहीर झाली नसल्याने या प्रकल्पाबाबतची अनिश्चितता कायम राहिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसताना, माहिती मात्र वेळोवेळी का बदलते? असा सवाल नागरिक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT