Crowds gather to catch fish on the Barvi River in the first rain
मुरबाड : किशोर गायकवाड
मान्सून पूर्व पावसाने काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी मुरबाडच्या मासळीप्रेमींना पहिला पाऊस मोठ्या पर्वणीचा ठरला असल्याचे चित्र मुरबाडमध्ये पाहायला मिळत आहे.
यंदा मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुरबाड तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहिले. त्यामुळे मुरबाडच्या मच्छीमारप्रेमींनी गळ, पागेर व मासेमारीचे इतर पारंपरिक साहित्य घेऊन सरळ नदीकडे धाव घेतली. विशेषतः पहिल्या पावसातच बारवी नदीवर मासे पकडणार्यांची तुंबळ गर्दी पाहायला मिळत आहेत.
मुरबाडच्या बारवी नदीला जणू माशांचे वरदानच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने तालुक्यातील मच्छीमार याठिकाणी गोड्या पाण्यातील मच्छी पकडण्यासाठी धाव घेत आहेत.
कटला, गावठी वाय, मोठी कोळंबी, करवाळी, तेलाप्पे याशिवाय चिचे, मळे, मुरी असे आकाराने छोटे परंतु चवीने अत्यंत स्वादिष्ट असलेल्या मासळीसाठी मच्छीमारांची अधिक पसंती दिसून येत आहे.
दररोज वेगवेगळ्या आकाराची व प्रजातीची शेकडो किलो मच्छी बारवीच्या नदीपात्रातून पकडली जाऊन शहरातील बाजारपेठेत तसेच म्हसा, सरळगाव अशा नाक्यांवर विक्रीसाठी आणली जाते. तर काही मच्छीमार ही गावठी मासळी चुलीच्या उतणावर वाळवून दीर्घकाळ खाता यावी यासाठी हळद लावून साठवून ठेवतात. त्यामुळे पावसाळ्यात मासे खाद्यप्रेमींना दीर्घकाळ मासे खाता येतात. मात्र सुकवलेली मासळी ओल्या मासळीपेक्षा किमतीने महाग विक्री होते. ओली मासळी जेमतेम दोनशे ते तीनशे रुपये किलो तर सुकवलेली मासळी तब्बल चारशे ते पाचशे रुपये एक पायली मापाने विक्री केली जाते. सुकवलेली मासळी हळद, मीठ व मसाला घालून नुसत्या कांदा, तेलावर परतून घेतली तरी ती भाकरीसोबत रुचकर लागते. त्यामुळे बारवी नदीच्या माशांना तालुक्यात विशेष मागणी आहे.
- चंद्रकांत मनोज शेळके, (मच्छीमार) आघाशी-मुरबाडआम्ही नेहमीच येथे मासे पकडण्यासाठी येत असतो. बारवी नदीमध्ये खूप प्रकारचे देशी मासे आहेत. आम्ही तासन्तास मासे पकडण्यात रमून जातो. दररोज मासे मिळतात. वेळ फुकट जात नाही. यातून आम्हाला रोजगार मिळतो शिवाय स्वादिष्ट मासे ही खायला मिळतात.