

Sword Attack Umberde Kalyan Youth Critical
डोंबिवली : कल्याण जवळच्या उंबर्डे गावात आज (दि.१) हल्ल्याची घटना घडल्याने परिसरातील वातावरण तंग झाले आहे. या गावात घराच्या बाहेर शौचालय बांधण्याचा वाद शिगेला पोहोचला आणि या वादातून काही तरूणांनी शेजारी राहणाऱ्या तरूणावर तलवारीने सपासप वार केले. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या तरूणाला तत्काळ केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयामध्ये तातडीने उपचार सुरू केले. हा तरूण बचावला असून तरीही त्याची प्रकृती गंभीर असल्याचे रूग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले.
विक्रांत जाधव असे या जखमी तरूणाचे नाव आहे. तर हा तरूण राहत असलेल्या घरा शेजारील तरूणांनी विक्रांतवर हल्ला केल्याच्या आरोप जखमी विक्रांतच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे.
कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावठाण परिसरात विजय जाधव हा तरूण कुटुंबासह राहतो. त्याच्या घराशेजारीच गायकवाड कुटुंब राहते. विजय जाधव ज्या जागी राहत आहेत, त्या घराच्या जागेवर गायकवाड कुटुंबाने दावा केला. या जागेवरून जाधव आणि गायकवाड यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विजय जाधव याने त्याच्या घराच्या शेजारी शौचालय बांधण्याचे काम सुरू केले. हे शौचालय या जागेत बांधण्यास गायकवाड कुटुंबाने विरोध केला.
आठवडाभरापासून जाधव कुटुंबीय त्यांच्या जागेत शौचालय बांधण्याचे काम करत आहेत. गायकवाड कुटुंबाने काम मध्येच बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काम सुरू केल्यास जीवानिशी जाल, अशी गायकवाड कुटुंबीयांनी जाधव कुटुंबीयांना धमकी दिली. या व्यतिरिक्त गायकवाड कुटुंबीयांनी दोन लाख रूपयांची मागणी देखील केल्याचे विजय जाधव यांनी पोलिसांना सांगितले.
आज सकाळी विजय यांचा मुलगा विक्रांत घरापासून काही अंतरावर पाणी आणण्यासाठी गेला होता. त्याच्या मागावर गायकवाड कुटुंबीयांतील तरूण पाळतीवर होते. एकटा असल्याची संधी साधून गायकवाड कुटुंबातील तरूणांनी रस्त्यात गाठून विक्रांतवर तलवारीने सपासप वार केले. जीवघेणे वार झाल्याने विक्रांत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर विक्रांतचे वडील विजय जाधव यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. तथापि अद्याप कुणीही हाती लागले नसून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.