भाईंदर : भाजपाचे मिरा-भाईंदरमधील आ. नरेंद्र मेहता यांनी गेल्या दिवाळीत आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसैन यांच्या उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च ट्रस्टची जाणूनबुजून चुकीची, दिशाहीन, बेजबाबदार, निराधार वक्तव्य करून समाजामध्ये बदनामी केल्याप्रकरणी ट्रस्टकडून १८ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात मेहता यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केल्याची माहिती मुझफ्फर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सन २०१४ ते २०१९ दरम्यान मेहता हे आमदार असताना सतत ट्रस्टच्या कारभाराविरोधात सार्वजनिकरित्या जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करून समाजामध्ये ट्रस्टची बदनामी करीत होते. यामुळे सप्टेंबर २०१९ मध्ये ट्रस्टकडून त्यांच्या विरोधात याचिका क्रमांक ९४६/२०१९ अन्वये २५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. यावर न्यायालयाने मेहता यांना त्यावेळी प्रसारीत केलेली व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावरून काढून टाकणे तसेच ट्रस्टच्या संदर्भात यापुढे चुकीची, बेजबाबदार, निराधार विधाने करू नयेत, अशा प्रकारचे मनाई आदेश दिले होते.
नियमानुसार ट्रस्टच्या वतीने राज्य शासनाचा आरोग्य विभाग, महापालिका आदी संबंधित विभागांना विस्तृत माहिती, अहवाल नियमितपणे सादर केला जातो. असे असतानाही मेहता यांनी गेल्या दिवाळीत आयोजित एका कार्यक्रमात ट्रस्टबाबत पुन्हा बेजबाबदार वक्तव्य केल्याचे मुझफ्फर यांनी निदर्शनास आणून दिले.
मेहता यांनी त्या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक ठिकाणी ट्रस्टच्या कारभारासंदर्भात टिका करीत जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने बिनबुडाचे, बेजबाबदार, निराधार वक्तव्ये करून समाजामध्ये ट्रस्टची बदनामी केली. तसेच ट्रस्टकडून मदत देण्यात आलेल्या काही रुग्णांची नावे उघड केली. नियमानुसार सार्वजनिकरित्या रुग्णांची नावे जाहीर करता येत नसल्याचा दावा मुझफ्फर यांनी केला आहे.
यानंतरही मेहता यांनी रुग्णांची नावे जाहीर करून तसेच उच्च न्यायालयाने सन २०१९ मध्ये त्यांना ट्रस्ट संदर्भात कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास मनाई आदेश जारी केला असतानाही मेहता यांनी पुन्हा ट्रस्ट विरोधात बेजबाबदार, चुकीची वक्तव्ये करून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप मुझफ्फर यांनी केला. या अनुषंगाने ट्रस्टच्या वतीने मेहता यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्याचे मुझफ्फर यांनी सांगितले.