

सापाड : योगेश गोडे
कल्याण शहराची ओळख म्हणून उभारला गेलेला मुख्य स्कायवॉक आज गुन्हेगारी, अस्वच्छता आणि अनधिकृत धंद्यांच्या विळख्यात अडकला आहे. प्रवाशांची सोय व्हावी, पादचारी मार्ग सुकर व्हावा या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा स्कायवॉक आता भिकारी, व्यसनी, अनधिकृत फेरीवाले, तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्यांचे माहेरघर झाल्याचे चित्र समोर येत आहे. महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि पोलिसांची उदासीनता यामुळे या ठिकाणी दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.
कल्याण स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी स्कायवॉकचा वापर करतात. परंतु रोज सकाळ-संध्याकाळ गर्दुल्यांचे टोळके या भागात फेरफटका मारताना दिसतात. काही ठिकाणी त्यांनी स्वतःचे 'अड्डे' तयार केल्याचे दिसत आहे. या गर्दुल्यांचा त्रास इतका वाढला आहे की महिलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना स्कायवॉकवरून चालणेही अवघड झाले आहे. काहीजण प्रवाशांकडून उर्मटपणे पैसे मागतात. न दिल्यास शिवीगाळ, धक्काबुकीचे प्रकार घडतात.
महापालिकेने स्कायवॉकवर फेरीवाल्यांना परवानगी दिलेली नसतानाही दिवसरात्र अनधिकृत फेरीवाल्यांनी येथे अतिक्रमण केले आहे. फळविक्रेते, कपडे विकणारे, बनावट अॅक्सेसरीज विक्रेते, सगळ्यांचे दुकान स्कायवॉकवर मोकळेपणाने चालते. गर्दीच्या वेळी फेरीवाल्यांचा ताबा इतका असतो की प्रवाशांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास दहा-दहा मिनिटे लागतात.
महापालिकेचे पथक अधूनमधून कारवाई करते मात्र कारवाई 'दाखवण्यासाठी'च केली जाते, महापालिका अधिकारी आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यातील साटेलोट्यातून सर्वसामान्य प्रवाशांना स्कायवॉक वरून चालताना वेठीस धरले जाते. तर स्टेशन आणि स्कायवॉक परिसरात भिकारी हा आज गंभीर सुरक्षा प्रश्न बनला आहे. या ठिकाणी काही विशिष्ट 'गट' काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणी बसून ते प्रवाशांकडे हात पसरतात, काही जण जाणीवपूर्वक लहान मुलांचा आधार घेऊन पैसे उकळतात.
रात्रीच्या वेळी काही भिकारी स्कायवॉकवर झोपी जातात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे आणि अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरते. यावर प्रशासनाने कधीही ठोस उपाययोजना केलेली नाही. ही खंत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
स्कायवॉकच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
स्कायवॉकवर काही तृतीयपंथी नागरिकांची टोळकी प्रवाशांकडे जबरदस्तीने पैसे मागतात. काही जण हातपाय लावणे, शिवीगाळ करणे असे प्रकार घडवून आणतात. तक्रार केली तरी कोणीही ऐकून घेत नाही, असा प्रवाशांचा संताप आहे. कल्याण परिसरातील सुरक्षिततेवर या तृतीयपंथीयांच्या गैरवर्तणुकीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सकाळ संध्याकाळी स्कायवॉकचा 'चेहरा' पूर्णपणे बदलतो. काही संशयित महिलांची टोळी या भागात वाढलेला वावर पाहून देहविक्रीसारखे गुन्हे येथे वाढत चाललेली आहे. स्टेशन परिसरात खुलेआम होणाऱ्या या हालचालीमुळे स्कायवॉकच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. रात्रीच्या वेळी स्कायवॉकवर होणाऱ्या हालचालींवर कुठलीही नियंत्रण यंत्रणा नसल्याने हा भाग गुन्हेगारीला खतपाणी मिळवून देत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
बहुतेक कॅमेरे निष्क्रिय
स्कायवॉक उभारण्याचे मूळ उद्दिष्ट म्हणजे पादचाऱ्यांचे संरक्षण, वाहतुकीची कोंडी कमी करणे, स्टेशन परिसरातील सुरक्षाव्यवस्था बळकट करणे असला तरी प्रत्यक्षात आज स्कायवॉकचा उपयोग हेतूपुरता न राहता गुन्हेगारी वृत्तीच्या घटकांसाठी सुरक्षित आश्रयासारखा होत आहे. त्यातच कचऱ्यामुळे स्कायवॉकवर घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांनी महापालिकेकडे आणि पोलिसांकडे तक्रारी दिल्या, पण कोणालाही या समस्येची खऱ्या अथनि दखल घ्यायची तयारी नाही.
स्कायवॉकवर चालणे म्हणजे जीव मुठीत घेऊन चालण्यासारखे झाले आहे. फेरीवाल्यांना पाठिंबा देणारे अधिकाऱ्यांसह राजकीय हात, त्यामुळे कारवाई अर्धवटच राहते. महिलांना रात्री स्काय वॉक वरून एकटं जाणं शक्यच नाही. स्कायवॉकवर पोलिसांची गस्त फार कमी दिसते. दिवसा थोडीफार वाहतूक नियंत्रणाची हालचाल दिसते; पण संध्याकाळीनंतर पूर्ण अंधार आणि निर्जनता या गुन्हेगारांना आणखी वाव देतात. सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचा दावा केला जातो, पण बहुतेक कॅमेरे निष्क्रिय आहेत.