

मुंबई : स्वप्निल कुलकर्णी
स्वतःचे पुस्तक प्रकाशित व्हावे, ही प्रत्येक लेखकाची इच्छा असते. ते पुस्तक जर साहित्य संमेलनात प्रकाशित झाले, तर तो त्या लेखकासाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखकांना मानाचे पान मिळणार असून विविध साहित्य प्रकारातील 99 पुस्तके प्रकाशित करण्याचे नियोजन प्रकाशन कट्टा समितीद्वारे करण्यात आल्याचे समजते.
संमेलनाच्या प्रकाशन कट्टा समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये साताऱ्यात होणाऱ्या ऐतिहासिक संमेलनातील प्रकाशन कट्ट्याबाबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी प्रकाशन कट्टा प्रमुख शिरीष चिटणीस, मुख्य समन्वयक घनश्याम पाटील, नंदकुमार सावंत, श्रीराम नानल, सदस्य प्रा. संदीप सांगळे, अजित क्षीरसागर, प्रताप महांगडे, ॲड. जान्हवी जोशी, डॉ. दीपक राऊत, डॉ. केशव मोरे यांच्यासह अन्य समिती सदस्य उपस्थित होते.
याबद्दल अधिक माहिती देताना प्रकाशन कट्टाचे मुख्य समन्वयक घनश्याम पाटील यांनी सांगितले की, कवीकट्टा, गझलकट्टा याप्रमाणे प्रकाशनकट्टा स्वतंत्रपणे केला. हे ऐतिहासिक संमेलन असल्याने यावेळेस प्रकाशन कट्ट्यामध्ये काही वेगळे उपक्रम राबवणार आहोत. संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अनेक लेखक उत्सुक आहेत.
1 जानेवारीला प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन आणि काही पुस्तकांचे प्रकाशन होईल. यावेळी रोज ठरावीक सत्रांचे आयोजन केले जाणार असून त्या त्या सत्राला नामवंत साहित्यिक, लेखक उपस्थित राहून पुस्तकांचे प्रकाशन करतील आणि त्या पुस्तकांवर भाष्य करतील. यावेळी लेखकांना प्रत्येकी पाच मिनिटे मनोगत व्यक्त करण्याची संधीही मिळणार आहे, असेही घनश्याम पाटील यांनी सांगितले.
प्रकाशनकट्ट्याचे समाजमाध्यमातून प्रक्षेपण
विशेष म्हणजे प्रकाशन कट्ट्यातील सर्व कार्यक्रम यूट्यूब आणि फेसबुक लाईव्ह येणार आहेत. संमेलनातील चारही दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कट्टा अविरत सुरू असेल. लेखकांसाठी सहभाग शुल्क पाचशे रुपये असून ते थेट संमेलनाच्या संकेतस्थळावर भरता येईल. ज्या पुस्तकांची प्रकाशनासाठी निवड होणार नाही त्यांना ते परत केले जाईल. 15 डिसेंबर 2026 पर्यंत लेखकांनी आपली पुस्तके पाठवावीत. अधिक माहितीसाठी प्रकाशनकट्टाचे मुख्य समन्वयक घनश्याम पाटील (7057292092) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संमेलनातील प्रकाशित पुस्तकांवर वर्षभर चर्चासत्रे
साताऱ्यातील साहित्य संमेलनात ज्या लेखकांची पुस्तके प्रकाशित होतील त्यांच्या पुस्तकांवर पुढील वर्षात एक दिवस दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात येईल. त्यासाठी संस्थेद्वारे सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल. कार्यक्रमाचे नियोजन, प्रसिद्धी ही संस्था बघणार आहे.