कल्याणमध्ये मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज pudhari photo
ठाणे

Congress Protest in Kalyan : कल्याणमध्ये मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

जेफ्री एपस्टीन फाईल प्रकरणातील गंभीर सत्य देशापासून दडपले जात असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कल्याण/ सापाड : कल्याण-डोंबिवली शहरात केंद्रातील मोदी सरकारच्या कथित अपयशांविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले. जेफ्री एपस्टीन फाईल प्रकरणातील गंभीर सत्य देशापासून दडपले जात असल्याचा आरोप करत, देशातील तरुणाईच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले होते.

युथ काँग्रेसचे कल्याण-डोंबिवली शहराध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण-डोंबिवली महानगरपालिका असा मोर्चा काढण्यात आला. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे उपस्थित नागरिकांचे आणि माध्यमांचे विशेष लक्ष वेधले गेले. केंद्र सरकारच्या धोरणांवर उपहासात्मक आणि तीव्र टीका करण्यासाठी या प्रतिकृतींचा वापर केल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.

मोर्चा अहिल्याबाई चौक येथील भाजपा कार्यालयाच्या दिशेने सरकू लागल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव आंदोलन चौकातच अडवले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतले.

“पैसे घ्या राजीनामा द्या! तरुणाईचा आवाज दाबून टाकणारी सत्ता चालणार नाही”, “सत्य लपवणाऱ्या सरकारचा निषेध”, “मोदी सरकार हटवा लोकशाही वाचवा” अशा घोषणा परिसरात घुमत होत्या. आंदोलकांच्या हातात केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करणारे फलक झळकत होते. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, नवीन सिंग, जगजीत सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

जेफ्री एपस्टीन प्रकरणासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गंभीर विषयावर सरकार जाणीवपूर्वक मौन बाळगत आहे. देशातील तरुण बेरोजगारी, महागाई, शिक्षण व्यवस्था, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. आज देशातील तरुणाई अस्वस्थ आहे, परंतु तिचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी करत आहेत.
जगजीत सिंग, युवा जिल्हा अध्यक्ष, युथ काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT