डोंबिवली : देशात वाढलेल्या गॅस सिलिंडरच्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने बुधवारी कल्याणच्या तहसीलदार कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी चूल पेटवून भाकरी थापत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती अर्थकारण कोलमडले असून वाढत्या महागाईमुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरवाढ तत्काळ कमी करावी तसेच नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. दरवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, नगरसेविका कांचन कुलकर्णी, प्रदेश काँग्रेसचे महासचिव ॲड. नवीन सिंग, ज्येष्ठ काँग्रेस नेते मामा पगारे, राजेश ऊ र्फ मुन्ना तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.