दिपप्रज्‍ज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात कवी प्रवीण दवणे यांच्या हस्‍ते करण्यात आली.  Pudhari Photo
ठाणे

Classical Marathi Language Day |मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच : कवी प्रा. प्रवीण दवणे

अभिजात मराठी भाषा दिवसानिमित्त प्र. के. अत्रे रंगमंदिरात व्याख्यानाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मराठी भाषा हा आपला वडिलोपार्जित ठेवा आहे. या ठेव्याची जपणूक आपण केली पाहिजे. मराठी भाषा म्हणजे अमृताचे रसवंतीगृहच आहे. तिचे आकलन झाले नाही तर घराघरात असलेल्या मराठी भाषारूपी अमृताच्या रसग्रहणापासून आपण दूर रहाल, अशी भीती प्रख्यात कवी तथा साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी कल्याणात बोलताना व्यक्त केली. अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून शुक्रवारी महानगरपालिकेच्या आचार्य प्र. के. अत्रे रंगमंदिरात मराठी भाषेतील अभिजात सौंदर्य, या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रा. प्रवीण दवणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

या प्रसंगी महापालिका आयुक्त अभिनव गोयल‍, अतिरिक्त आयुक्त योगेशे गोडसे, मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे, उपायुक्त संजय जाधव, कांचन गायकवाड, सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके, माजी नगरसेविका खुशबू चौधरी, महापालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी, तसेच कला रसिक व साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानाची सुरूवात अभिजात मराठी भाषेच्या सुरेख काव्याने करत प्रा. प्रवीण दवणे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभीच उपस्थित श्रोतृवर्गाची मने जिंकली. एखाद्या प्राचिन वाड्याची डागडुजी केली नाही तर तो ढासळतो. आपल्या पूर्वजांनी उभारलेला उत्कृष्ठ मराठी भाषारूपी वाडा वंशजांनी सांभाळला नाही तर मराठी भाषेचे सौंदर्य देखील लोप पावेल. आपली अप्रतिम मराठी भाषा केवळ नदीचा ओहळ म्हणून शिल्लक राहू नये, असे सांगत प्रा. प्रविण दवणे यांनी संत ज्ञानेश्वरांपासून संत सावता माळी या संत परंपरेतील तत्कालिन भक्ती गीतांतील शब्द रचना सूलभ आणि ओघवत्या मराठी भाषेत अलवार उलगडून दाखविली.

मराठी भाषा ही अमृताचा घडा आहे. ती ग्रहण करताना जेव्हा कानाचा डोळा होतो. तेव्हा भाषेकडे कानाडोळा होत नाही. अभिजात मराठी भाषा दिन या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणजे आपले मराठीपण जपणे होय. पुढच्या पिढीचे प्रश्न हे धनाचे नसतील, तर मनाचे असतील, त्यासाठी मराठी भाषेशी जवळीक केली पाहिजे, असे मत प्रा. प्रविण दवणे यांनी व्याख्यानातून व्यक्त केले.

आपली भाषा विकसित होण्यावर भर द्यावा. साहित्यच नव्हे तर पुस्तक वाचन देखिल दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. समाजात वाचनसंस्कृती वाढली पाहिजे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांच्या भाषणातून केले. वाचन ही संस्कृती व्हावी, या साठीच आठवड्यात एक दिवस वाचनदिन म्हणून आपण निश्चित करूया, असेही ते पुढे म्हणाले.

मराठीतील प्रख्यात कवयित्री शांता शेळके व इतर कवींच्या काव्य पंक्ती उद्धृत‍ करत सर्वांनी वाचनाचा परीघ समृध्द करावा, असे विचार महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. गतवर्षी मराठी भाषेला शासनाकडून अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे विचार महापालिका सचिव तथा मराठी भाषा अधिकारी किशोर शेळके यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले. या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचलन उद्यान विभागाचे महेश देशपांडे यांनी, तर माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT