

नाशिक: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे नाशिक शहरातील साहित्यिकांनी स्वागत केले आहे. लोकांनी व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करताना मराठा भाषा विद्यापीठालाही चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष असे...
भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
प्राचीन साहित्य हवे, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटते.
दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014) आणि आता मराठी (2024) भाषा होऊन ही संख्या 7 झाली आहे.
निवडणूकीच्या तोंडावर जरी निर्णय घेतला असला तरी, तो स्वागतार्ह आहे. मात्र, या निर्णयाचा आदर करून लोकांनी व्यवहारात मराठी भाषेचा वापर करायला हवा. कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मोठेपण टिकत नाही. तर भाषेचा वापर करून आपणच भाषा समृद्ध करायला हवी.
दिलीप फडके, अध्यक्ष, सावाना, नाशिक
राज्य व केंद्रात भाजपचे सरकार असतानाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास विलंब झाला. मात्र, उशिरा का होईना, अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद आहे. यासाठी सगळे पुरावे दिले गेले आहे. दर्जा मिळत नव्हता तोपर्यंत मराठी भाषिकांच्या भावना तीव्र होत्या. निर्णय स्वागतार्ह आहे
प्रकाश होळकर, सदस्य, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन
प्रत्येक मराठी भाषिकाला आनंद होईल असा हा निर्णय आहे. यासाठी खूप वर्षे मागणी करावी लागली. मराठी सर्व दृष्टीने पात्र असूनही निर्णय होत नव्हता. साहित्य अकादमीकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल दिला होता. सर्व बाजूंनी अनुकूल वातावरण असतानाही विलंब झाला. या निर्णयामुळे जुने वाड:मय अत्याधुनिक तंत्रज्ञानातून जतन करण्यास मदत होईल. याशिवाय मराठा भाषा विद्यापीठालाही चालना मिळेल.
प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, सामान्य परिषद सदस्य, साहित्य अकादमी, नवी दिल्ली
मराठी भाषा अभिजात आहेच. तिला शासनाने मान्यता दिली. मराठीला संस्कृत उद्भव मानले जाते. महाराष्ट्रात तिचे प्राकृत हे मुळ रूप आहे. हे रूप आकार घेत, परिणाम करत तेराव्या शतकापर्यंत तिची वाटचाल झाली. त्याच्या आधीही तिची पुर्वरुपे लोकसाहित्य, लोकसंस्कृतीतून व्यक्त झाली आहेत. शासनाने अभिजान दर्जा दिला. हे शासनाचे भाषाभान आपल्याला आत्मभान, राष्ट्रभान, विश्वभान देते. मराठी भाषा अशी संहिता आहे की, तिच्यात सर्व ज्ञान साठलेले आहे. तिची विचार प्रकटीकरणाची, कल्पनानिर्मितीची ज्ञान, महती अभिजात आहे. म्हणूनच तिला प्राप्त झालेला अभिजात दर्जा तिला आणखी उन्नत बनवेल.
एकनाथ पगार, साहित्यिक, नाशिक.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही आनंदाची, अभिमानाची बाब आहे. अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद हा वेगळेपण राखणारा आणि अस्मिता वा अहंकाराच्या अंगाने जाणारा नसावा. उपयुक्तता हा भाषा टिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असतो. सर्व भाषांचा आदर आणि सन्मान तसेच त्यांच्या स्विकाराची मानसिकता स्वभाषेला उन्नत बनवत असते.
मनोहर विभांडिक, साहित्यिक, नाशिक.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मी स्वत: विधानपरिषदेत मराठी भाषा समिती नेमून सर्वप्रथम हा विषय मांडला होता. मराठी भाषा संस्कृतमधून नव्हे तर, प्राकृतमधून निर्माण झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी जो लढा सुरु केला होता, तो आता शासनाच्या या निर्णयामुळे एका परिने पुर्ण झाला आहे. यामुळे भाषासमृध्दीसाठी केंद्राच्या अनेक योजनांमधून निधी आणता येईल. मराठी भाषा ही चांगल्या पध्दतीने ज्ञानभाषा होऊ शकेल, असा विश्वास वाटतो.
हेमंत टकले, विश्वस्त, कुसूमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक.