मिरा रोड : मीरा रोड येथील सहकारी संस्थेच्या पुर्नरेखापरीक्षणाचा अहवाल देण्यासाठी 6 लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेणाऱ्या एका सनदी लेखापालास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. अविनाश बबन मोहिते (वय 43) असे अटकेतल्या आरोपीचे नाव असून तो उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे येथे प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
मीरा रोड येथे राहणारे तक्रारदार वय 52 वर्षे यांनी ते राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेचे सन 2021-22 या वर्षाचे पुनरलेखापरीक्षण करून त्याचा अहवाल देण्याची मागणी केली होती. त्या बदल्यात आरोपी अविनाश मोहिते याने 6 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम 3 लाख 50 हजार रुपये ठरवण्यात आली. त्यानंतर यातील लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये घेण्याचे आरोपीने मान्य केले होते.
तक्रारदाराने यासंदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 28 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 29 जानेवारी रोजी मिरा रोड येथील चंद्रेश एकार्ड बिल्डिंगमध्ये सापळा रचण्यात आला.
त्यावेळी तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना आरोपी मोहिते याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्याच्या मिरा रोड येथील राहत्या घराची झडती घेण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे ला.प्र.वि.चे पोलीस निरीक्षक विजय कावळे आणि सुनील कारोटे , तपास अधिकारी व त्यांच्या पथकाने केली आहे.