कल्याण: कॉलेजपासून तब्बल आठ वर्षे रंगलेलं प्रेम, त्यानंतर कोर्ट मॅरेज, लग्नासाठी हॉल बुकिंग, हळदीची तयारी आणि घरात लगीनघाईचं वातावरण... पण ऐन लग्नाच्या दोन दिवस आधीच घडलं भलतंच! हळदीच्या दिवशीच नवरी तिच्या आई-वडिलांसह आणि मामासोबत अचानक गायब झाल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. हताश झालेल्या नवऱ्याने अखेर मानपाडा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
डोंबिवलीतील एका तरूणाचे आणि एका तरुणीचं कॉलेजपासून गेली आठ वर्षे प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला; मात्र मुलगा परजातीचा असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केला. तरुणीला मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
अखेर दोघांनी ठाणे न्यायालयात जाऊन कायदेशीर कोर्ट मॅरेज केलं. कोर्ट मॅरेजनंतर दोन दिवस तरुणी तक्रारदार तरूणासोबत राहत होती. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी समाजात मान राखण्यासाठी चारचौघांत लग्न लावू अशी समजूत काढल्याने तरूणानेही विश्वास ठेवला.
लग्नासाठी हॉल बुक झाला, तयारी सुरू झाली आणि 21 मे रोजी हळदीचा कार्यक्रमही ठरला. मात्र, हळदीच्या दिवशी तरूणाने केलेल्या मेसेजला तरुणीकडून उत्तरच आलं नाही.
संशय आल्याने तरूण पोलिसांसह तिच्या घरी पोहोचला, तर घराला कुलूप आणि संपूर्ण कुटुंब गायब झाले. माझ्या पत्नीचं काही बरेवाईट झालं तर तिचे आई-वडील आणि मामा जबाबदार असतील, असा आरोप हताश झालेल्या तरूणाने केला आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.