ठाणे :ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर (फुटओव्हर ब्रिज) गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे.
घोडबंदर रोडवरील ब्रम्हांड जंक्शन येथे मुल्लाबाग बस डेपो जवळ फुटओव्हर ब्रिजवर आरपीएस पीआरएस जॉईंट व्हेंचर प्रा. लि. यांच्या वतीने गर्डर उभारणीचे काम करण्यात येणार आहे. हे काम 8 मे रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून 9 मे रात्री 11.55 वाजेपर्यंत तसेच 9 मे रात्री 11.55 वाजल्यापासून 10 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. तरी, जड - अवजड वाहनांनी या कालावधीत या मार्गावरून प्रवास करणे टाळावे. असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ही वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचे वाहतूक विभागाने नमूद केले आहे.
हे मार्ग राहणार बंद
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलकडून मानपाडा-ब्रह्मांड सिग्नलमार्गे कापुरबावडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
एमजी मोटर्स शोरूम, मानपाडा येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांनाही ब्रिज चढणीवर प्रवेश बंद असेल.
पर्यायी मार्ग
कापुरबावडीकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रह्मांड सिग्नलवरून डावीकडे वळून ब्रह्मांड सर्कल, आझादनगर रोड, लोढा आमारा समोरील चौक, कोलशेत-ढोकाळी रोडमार्गे कापुरबावडीकडे जावे.
घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनांनी मानपाडा ब्रिजलगतच्या स्लिप रोडने नागोरी टी स्टॉलजवळ डावीकडे वळून टिकुजीनी वाडी सर्कलमार्गे वेरिएंट निलकंठ ग्रीन समोरील रस्त्याने मुल्लाबाग कटमार्गे इच्छितस्थळी जावे, असेही वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.