Ambernath Nagarparishad Result 2025 file photo
ठाणे

BJP Congress alliance: कारण राजकारण...! बहुमतासाठी भाजपची काँग्रेससोबत युती; अंबरनाथमध्ये नेमकं काय घडतंय?

Ambernath Nagarparishad Result 2025: 'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा करणाऱ्या भाजपची ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत मात्र वेगळीच रणनीती पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ambernath Nagarparishad BJP Congress alliance

अंबरनाथ : 'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा करणाऱ्या भाजपची ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत मात्र वेगळीच रणनीती पाहायला मिळत आहे. अंबरनाथमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने चक्क काँग्रेसला सोबत घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या नव्या समीकरणामुळे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाला असून, त्यांनी भाजपवर 'अभद्र युती'चा आरोप केला आहे.

अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुळे या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. आता भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४, असे एकूण ३२ नगरसेवकांची मोट बांधून भाजप बहुमत मिळवणार आहे. दरम्यान, शिंदे गटाने ही तर अभद्र युती असल्याची टीका भाजपवर केली आहे. ही युती शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे. एकीकडे काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्या भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केला आहे.

दुसरीकडे गेल्या पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती, असे भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे-पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुती करण्यासंदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही, असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.

ठाण्याला लागून असलेल्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपने अनेक वर्षांची सत्ता असलेल्या शिवसेनेला (शिंदे गट) जोरदार धक्का दिला. राज्यातील लक्षवेधी हे सत्तांतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका ठरले होते. अंबरनाथमधील निवडणुकीची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ही नगरपरिषद श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे याठिकाणी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अंबरनाथ हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जात होता. याच बालेकिल्ल्यात भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी सुरुंग लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT