Stray dog attack‌ File Photo
ठाणे

Bhiwandi Stray Dog Attack: भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत : श्वानदंशाने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, प्रशासनावर गंभीर प्रश्न

वर्षभरात 11 हजारांहून अधिक श्वानदंश; अँटी-रेबीज लसीच्या उपलब्धतेवर व निर्बीजीकरण योजनेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून मागील वर्षभरात 11 हजार 37 जणांना श्वानदंश झाल्याची आकडेवारी समोर येत असतानाच एका श्वानदंश झालेल्या 12 वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हामिद सद्दाम खान असे श्वानदंशाने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

शहरातील ईदगाह या परिसरात घराबाहेर खेळत असताना 10 जानेवारी रोजी भटक्या कुत्र्याने हामिद सद्दाम खान यावर हल्ला चढवत त्याच्या चेहऱ्यावर मानेजवळ चावा घेतला होता. त्यावर स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे प्रथमोपचार करून झाल्यावर, पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी 27 जानेवारी रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारा दरम्यान 31 जानेवारी रोजी हामिद याची प्राणज्योत मावळली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे पालिकेचे 12 वर्षांपासून बंद असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र मागील वर्षी सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ही शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत असून जानेवारी या एका महिन्यात 1 हजार 62 जणांना श्वानदंश झाल्याची माहिती समोर येत आहे. भटक्या कुत्र्याच्या दहशतीमुळे मी स्वतः भयभीत असून भिवंडी सारख्या शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशा वरील प्रतिबंधक अँटी रेबीज लस वेळेत न दिल्याने ही समस्या उद्भवल्याने एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ही गंभीर बाब असून या जबाबदार असणाऱ्यांवर आपण कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

श्वानदंश झालेल्या हामिद खान या रुग्णालयात दाखल करून घेत तिन्ही इंजेक्शन डोस वेळोवेळी देण्यात आले होते. त्यानंतर 27 जानेवारी रोजी रुग्णास श्वसनाचा त्रास होत असल्याने पालक त्यास घेऊन रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्याच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवले तेथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची माहिती स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ.माधवी पदारे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT