Bhiwandi hotel clash Pudhari
ठाणे

Bhiwandi hotel clash: हॉटेलमध्ये गाणे वाजवण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी, अकरा जणांना अटक

सोनाळे येथील हॉटेलमध्ये गाणे बदलण्यावरून दोन गटांत वाद; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल, दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी: भिवंडीत हॉटेलमध्ये सुरू असलेले गाणे बदलून दुसरे गाणे वाजवण्याचा वादात दोन गटात तुफान हाणामारी होत पिस्टलमधून गोळीबार आणि चॉपरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे येथील हॉटेलमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दोन्ही गटातील एकूण ११ जणांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे.

भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील हॉटेलमध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. हॉटेलमध्ये गाणे सुरू असताना एका गटाने ते बंद करून मराठी गाणे लावण्यास सांगितले. मात्र, यावरून दुसऱ्या गटाने त्यास हरकत घेतली.

त्यामध्ये साऊंड बॉक्स उचलून दुसऱ्या टेबलजवळ नेण्यावरून वाद आणखी चिघळला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झाली, त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्यानंतर एका गटातील साईनाथने कमरेला लावलेले पिस्टल काढून समोरच्या गटाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीनुसार, चॉपरने हल्ला केला. या झटापटीत काहीजण जखमी झाले.

या घटनेचा हा संपूर्ण थरार हा हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्‍हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल

भिवंडी तालुका पोलिसांनी याप्रकरणी कुणाल पाटील रा. सरवली पाडा यांच्या तक्रारीवरून पिस्टलमधून हवेत गोळीबार करणारा साईनाथ, जयेश, अनिकेत, पंकज, प्रशांत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अनिकेत जाधव, रा. कल्याण यांनी दिलेल्या तक्रारीवरून नयनाथ, मुसा, हॉटेल मालक, हॉटेल मॅनेजर व इतर सात ते अनोळखी यांच्या विरोधात तक्रार देण्‍यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणी अकरा जणांना अटक केली आहे. या घटना प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT