

मुंबई: तानसा विभागातील वर्कशॉप व फिल्टर प्लांटच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने ट्रान्सफॉर्मर आणि वेल्डिंग केबल्स चोरी केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत, महापालिकेने तानसा धरण परिसरातील सीसीटीव्हीची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरण परिसर अधिक सुरक्षित होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील विविध जलस्त्रोतांमधून मुंबई शहराला दररोज साधारणतः ४१०० द.ल.लि. पाणी पुरवठा केला जातो. यातील प्रमुख जलस्रोत म्हणजे तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व भातसा धरणांचा समावेश आहे. यापैकी तानसा धरण हा अतिशय महत्त्वाचा जलस्त्रोत असून या धरणातून मुंबईला प्रतिदिन ४५० दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे
मुंबई शहराला अखंड पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी तानसा धरणाची देखभाल हे महत्त्वाचे आहे. तानसा धरण हे १८९२ मध्ये कार्यान्वित झालेले दगडी धरण आहे. तानसा धरण परिसरात एक निरीक्षण बंगला, मोडक बंगला, एस.ई. क्वार्टर्स, सहाय्यक अभियंता (तानसा) यांचे कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, दवाखाना, सुरक्षा चौकी, वायरलेस नियंत्रण कक्ष, परिवहन कर्मचारी कक्ष, भांडार कक्ष, तानसा धरणाला लागून असलेली एक आउटलेट विहीर, लघु जल विद्युत प्रकल्प (टर्बाइन) व कार्यशाळा बांधण्यात आल्या आहेत.
हे धरण मुंबई शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल परिसरात वसलेले आहे. तानसा धरणाचे प्रवेशद्वार, तानसा
यार्ड, स्काडा रूम, धरणाचे मुख्य
प्रवेशद्वार, आउटलेट वेल व उर्वरित स्पिलवे भागावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पण काही ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही संख्या वाढवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.
अपुऱ्या सीसीटीव्हीमुळे चोरी
सीसीटीव्ही निगराणी प्रणाली असूनही तानसा धरणातील काही संयंत्रे सीसीटीव्ही निगराणीच्या कक्षेत येत नाहीत. त्यामुळे अलीकडेच तानसा विभागातील वर्कशॉप व फिल्टर प्लांटच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने ट्रान्सफॉर्मर व वेल्डिंग केबल्स चोरल्या होत्या. वर्कशॉपजवळ सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे चोरांचा शोध घेणे कठीण झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.