संजय भोईर
भिवंडी: भिवंडीत अनुदानित उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे डोनेशन म्हणून अतिरिक्त फी मागणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिके - सह, खासगी लिपिक व खासगी शिक्षक अशा तिघांविरोधात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना अटक केली.
अतिया खान मुख्याध्यापिका, रिजवाना बानू अमजद खान खासगी शिक्षक, अस्मा शेख खासगी लिपिक अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील उर्दू माध्यमाच्या शासकीय अनुदानित शाळेत तक्रारदार अबुलैस अन्सारी यांच्या मुलीच्या आठवी इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी 7 मे रोजी गेले असता त्यांनी शाळेची 5 हजार रुपये देणगी व फी असल्याचे सांगितले.
सदरची शाळा ही अनुदानित असतानाही देणगी व फी घेणे अन्यायकारक असल्याने अबुलैस अन्सारी यांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेत आपली कैफियत मांडली.
अन्सारी यांनी यानंतर तांत्रिक पुरावे व इतर बाबी तपासून 11 मे रोजी दुपारी शाळेत मुलीला प्रवेश देते वेळी 4000 रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी तिघा महिलांच्या
विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारणा - 2018 ) चे कलम 7 व 7 अ प्रमाणे रात्री उशिरा गुन्हा नोंद करून 12 मे रोजी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले असता तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वारेमाप फी
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पालकांना परवडेल यापेक्षा फी घेतली जात असल्याने प्रचंड नाराजी आहे. ॲडमिशन देताना सुरुवातीला पालकांच्या मुलाखतींसह अनेक मुलाखतींचे सोपस्कार करावे लागतात. त्यानंतर वारेमाप फी आकारली जाते. या असंतोषातूनच ही तक्रार झाली आणि कारवाईला सामोरे जावे लागले.