RTE Lottery: रायगडमध्ये 4345 विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशाची लॉटरी

शिक्षण हक्का बाबत जागरुकता, पालकांचा चांगला प्रतिसाद
RTE
RTEPudhari
Published on
Updated on

रमेश कांबळे

अलिबाग: रायगड जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठी झालेल्या ऑनलाईन सोडतीत (लॉटरी) 4 हजार 345 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रायगड जिल्ह्यातील 270 शाळांमध्ये 4784 जागा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी 9489 एकूण अर्ज प्राप्त झाले होते. राखीव जागांपैक्षा दुपट अर्ज आल्याने शालेय शिक्षण विभागामार्फत पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली.

जिल्ह्यातील विविध खासगी विनाअनुदानित शाळांमधील रिक्त जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून संगणकीकृत प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून पालकांना एसएमएसद्वारेही माहिती देण्यात आली आहे.

यातील 62 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अंतीम करण्यात आली आहे. आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये शिक्षण शुल्क, पाठ्यपुस्तके, गणवेश यांचा समावेश आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ठरवून दिलेल्या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेला या वर्षी पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, शिक्षणाच्या हक्काबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडून प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती. एकूणच, या लॉटरीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून, त्यांच्या भविष्यासाठी ही संधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

- ललिता दहीतुले माध्यमिक शिक्षणाधिकारी-रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news