Powerloom Industry Crisis Pudhari
ठाणे

Powerloom Industry Crisis: भिवंडीतील यंत्रमाग उद्योग संकटात, धाग्यांचे दर 25% वाढले; इराण-इस्राईल युद्धाचे सावट

कामगार गावी परतण्याच्या मार्गावर

पुढारी वृत्तसेवा

संजय भोईर

भिवंडी: इराण-इस्राईल-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेचे पडसाद आता महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रावर उमटू लागले असून, “महाराष्ट्राचे मँचेस्टर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडीतील यंत्रमाग उद्योगाला याचा मोठा फटका बसत आहे.

इंधन व गॅस टंचाई, कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि वाहतूक खर्चातील वाढ यामुळे हा उद्योग पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

यंत्रमाग उद्योगासाठी अत्यावश्यक असलेला सिंथेटिक, पॉलिस्टर व नायलॉन धागा हा पेट्रोलियम-आधारित कच्च्या मालापासून तयार होतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरातील अस्थिरतेचा थेट परिणाम धाग्यांच्या किमतीवर होत आहे. गेल्या महिनाभरात धाग्यांच्या दरात तब्बल 25 टक्क्यांनी वाढ झाली असून, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, बाजारात कपड्यांची मागणी कमी असल्याने उत्पादित मालाचे दर वाढवणे शक्य नसल्याने उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे.

भिवंडीत मोठ्या प्रमाणावर जॉबवर्क पद्धतीने कपडा उत्पादन केले जाते. व्यापारी आधीच ऑर्डर बुक करून ठेवतात; मात्र सध्याच्या वाढत्या खर्चामुळे त्या जुन्या दरात माल पुरवणे म्हणजे थेट तोटा सहन करणे ठरत आहे. त्यामुळे अनेक उत्पादकांनी उत्पादन कमी केले असून, काहींनी तात्पुरते बंदही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धाग्यांच्या दरातील सततच्या चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांना साठा करून ठेवणेही शक्य होत नसल्याने नव्या ऑर्डर्समध्ये घट होत आहे.

याचाच परिणाम म्हणून भिवंडीबरोबरच मालेगाव आणि इचलकरंजी येथील यंत्रमाग उद्योगही मंदीच्या विळख्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणारा हा उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कामगारांची कमतरता, कच्च्या मालाच्या दरातील अस्थिरता आणि घटलेली मागणी या तिहेरी संकटामुळे भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक हवालदिल झाले असून, उद्योग टिकवण्यासाठी त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

भिवंडीत यंत्रमाग उद्योगासाठी उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार येतात. दरवर्षीप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात लग्नसराईमुळे काही कामगार गावी जातातच; मात्र यंदा युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इंधन टंचाई, वाढते जीवनावश्यक खर्च आणि खानावळी बंद होण्याच्या घटना वाढल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हॉटेलमधील महागडे जेवण परवडत नसल्याने अनेकांनी गावी परतण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.

सॅटिन कॉटन कापडाचे जागतिक केंद्र

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात असलेले भिवंडी शहर हे केवळ लॉजिस्टिक्स हब नाही, तर विशेषतः सॅटिन कॉटन कापडाच्या उत्पादनात आणि घाऊक व्यापारात भिवंडीचा दबदबा आहे. सॅटिन कॉटन हे 100% सुती धाग्यांपासून बनवलेले कापड असते, परंतु त्याची विणण्याची पद्धत वेगळी असते. यामुळे कापडाच्या एका बाजूला नैसर्गिक चमक आणि मऊपणा येतो. हे कापड दिसायला रेशमी वाटते, पण घालताना सुती कापडासारखे आरामदायी असते.

भिवंडीत सॅटिन कॉटनचे प्रामुख्याने खालील प्रकार मिळतात

  • प्लेन सॅटिन : फॉर्मल शर्टस्‌‍ आणि कुर्तीसाठी याचा वापर होतो.

  • डिजिटल प्रिंट सॅटिन: आधुनिक फॅशन, डिझायनर शर्टस्‌‍ आणि महिलांच्या ड्रेस मटेरियलसाठी हे अत्यंत लोकप्रिय आहे.

  • गिझा सॅटिन : हे सर्वात प्रीमियम दर्जाचे कापड असून त्याची चमक अधिक काळ टिकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT