

कल्याण: केडीएमसी क्षेत्रात एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवली मोठा गाव ते दुर्गाडी रिंग रोड प्रकल्पाचे काम गेल्या सहा वर्षापासून सुरु आहे. मात्र या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली आहे, त्यांना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सहा वर्षापासून मोबदला दिले गेला नसल्याने बाधित शेतकरी आक्रमक झाले आहेत.
प्रशासनाने जमीन जोर जबरदस्तीने घेतल्यास त्याला आमचा विरोध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी जमिनीच्या मोबदल्या संदर्भात झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाला दिला आहे.
प्रकल्प बाधितांना जमीनाचा मोबदला रोख रक्कमेच्या स्वरुपात द्यावा, अशी मागणी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात लवकर केडीएमसी आयुक्तांनी प्रकल्प बाधितांची बैठक घ्यावी, अशी ही मागमी त्यांनी या वेळी केली आहे.
डोंबिवली पश्चिम मोठा गावं ते दुर्गाडी रिंग रोड प्रकल्पात जवळपास 350 शेतकऱ्याची अंदाजे साडे पाच हेक्टर जमीनबाधित होत आहे. त्यांची सुनावणी बुधवारी महापालिकेच्या ह प्रभाग कार्यालयात होती.
यावेळी भाजप नगरसेवक म्हात्रे यांच्यासह प्रकल्प बाधितांचे प्रतिनिधी राजू म्हात्रे, महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी सुरेंद्र टेंगळे, सचिन घुटे आदी उपस्थित होते. नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, महापालिकेच्या रिंग रोड प्रकल्पास बाधितांचा विरोध नाही.
मात्र त्यांच्या जागा रिंग रोड प्रकल्पात बाधित झाल्याने ते भूमीहीन झाले आहे. त्यांना दिला जाणार मोबदला हा कवडीमोल आहे. सरकारी नियमानुसार योग्य भावाने त्यांचा मोबदला दिला जावा. महापालिका टीडीआर स्वरुपात मोबदला देते. महापालिकेने रोख रक्कमेच्या स्वरुपात मोबदला द्यावा. एकाच जागा मालकाची जमीन अनेक प्रकल्पात बाधित झालेली आहे.
प्रशासनाची भूमिका काय?
पालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी सांगितले की, प्रशासन टीडीआर देण्यास तयार आहे. मात्र शेतकऱ्यांची रोख मोबदल्याची मागणी आयुक्तांकडे मांडली जाईल. लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलनाचा इशारा
मोबदल्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. “जमीन गेली, मोबदला नाही, हे सहन करणार नाही,” अशी संतप्त भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली.