भिवंडी : सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्येच्या गुन्ह्यात अटक करून आरोपीस भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. या विकृत आरोपीने काटईत पुन्हा एकदा एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केली आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या आरोपीच्या अवघ्या पाच तासात मुसक्या आवळल्या आहेत. सलामत अन्सारी (वय 34, रा. मधुबनी बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार 1 ऑक्टोबर रोजी काटईतील सात वर्षीय अल्पवयीन चिमुरडी दुपारी तीन वाजता शौचालयासाठी काही अंतरावरील असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेली होती. मात्र, बराच वेळ झाला तरी ती माघारी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता नजिकच्या चाळीतील एका बंद खोलीत एका कोपर्यात प्लास्टिक गोणीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. ज्यामुळे कुटुंबीयांसह सर्व परिसर या घटनेने हादरला होता. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सूत्र हालवत तपास केला असता पळून गेलेल्या सलामत अन्सारीने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले.
हा आरोपी विकृत नराधम असून याच गुन्हेगाराने 13 सप्टेंबर 2023 रोजी शहरातील फेणेगाव येथे चाळीतील सहा वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवत खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार करून हत्या करीत मृतदेह बादलीमध्ये कोंबून पसार झाला होता. या घटनेनंतर परिसरात तिचा शोध घेऊन ही ती न सापडल्याने अपहरणाच्या गुन्ह्यात तपास करताना परिसरातील खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यावेळी 15 सप्टेंबर रोजी नजिकच्या चाळीतील खोलीतून पोलिसांनी मृतदेह शोधून काढला. त्यानंतर संशयित आरोपीचा तपास करताना पोलिसांनी आरोपी सलामत अन्सारी यास बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील नवादा या गावात वेषांतर करून पाळत ठेवून अटक केली. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर त्यास अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली होती.
दरम्यान, न्यायालयीन सुनावणीसाठी 4 ऑगस्ट 2025 रोजी भिवंडी न्यायालयात ठाणे कारागृहातून पोलीस पार्टी घेऊन आली होती. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून आरोपी सलामत हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनावर अनेकांकडून टीका होत असताना बंदोबस्ता वरील पाच पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले होते. पोलीस आरोपीचा शोध घेत असताना आरोपी भिवंडी परिसरातच ओळख लपून वावरत होता. त्यानंतर तो काटई ग्रामपंचायत हद्दीत भाड्याने राहण्यासाठी एक आठवड्यापूर्वी राहण्यास आला होता. त्यानंतर त्याने 1 ऑक्टोबर रोजी ही दुष्कर्म केले आहे.