भिवंडी : भिवंडी तालुक्यातील ठाकूराचा पाडा येथील खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना कोनगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या दोघींना कल्याण येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या जवळून तब्बल १४ तोळे वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विशेष म्हणजे गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करून दागिने आणि पैसे चोरण्याची या महिलांची कार्यपद्धती असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
भिवंडीतील खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी आलेल्या ६७ वर्षीय स्मिता रायचंद जिवाणी यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंदिर परिसरातील व इतर ठिकाणावरील तब्बल १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला.
या तपासात कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा रोड, मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या रेश्मा कसबे (वय ३४) आणि सखू कांबळे (वय ६५) या दोन महिलांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्या जवळून तब्बल १४ तोळे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ व वयस्कर महिलांना हेरून गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने, पैसे चोरण्याची या महिलांची पद्धत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.