भिवंडी : संजय भोईर
भिवंडी शहरात झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर दुकान थाटून उपचार करीत असल्याच्या विरोधात आयुक्त अनमोल सागर यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर वैद्यकीय आरोग्य विभागाचे डॉ. संदीप गाडेकर व नियंत्रण प्रमुख डॉ. जयवंत धुळे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय अधिकार्यांनी मागील दोन महिन्यात चार बोगस डॉक्टरांवर कारवाई केल्यानंतर आता आपला मोर्चा अवैध प्रसूती व उपचार करणार्या दायींकडे मोर्चा वळवला आहे. शहरात अनधिकृतपणे प्रसूती उपचार करणार्या चार दायी महिलांवर पालिका वैद्यकीय विभागाने कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शांतीनगर परिसरातील गायत्रीनगर, फातिमा नगर, आझाद नगर या झोपडपट्टी भागात बेकायदा महिला कोणत्याही वैद्यकीय परवाना शिवाय प्रसूती व उपचार करीत असल्याची माहिती मिळाल्यावर बुधवार (9) रोजी रात्रीच्या सुमारास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.जयवंत धुळे, डॉ. प्रिया फडके,डॉ. राजकुमार शर्मा, डॉ. अक्सा अन्सारी व वैद्यकीय विभागातील कर्मचारी यांनी पंच व शांतीनगर पोलिसांनी गायत्रीनगर परिसरात चार दायी महिला या स्वतःजवळ कोणताही वैद्यकीय परवाना नसताना अवैधपणे प्रसूती व महिलांवर उपचार करताना आढळून आल्या.
त्या चारही महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडे आढळलेली 38 हजार 764 रुपयांची ऑलियोपॅथीची औषधे, उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. दरम्यान या महिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात डॉ. मोहम्मद शोएब अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लवकरच दोषारोपपत्र
चारही महिलांना नोटीस देण्यात आली असून त्यांच्या विरोधात लवकरच दोषारोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.
कारवाई सुरू ठेवणार...
शहरात बोगस डॉक्टरांसोबत अप्रशिक्षित दायी यांच्याकडून सर्रासपणे प्रसूती केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. ज्यामुळे माता-बाल रुग्णांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. त्यांना आळा बसावा यासाठी वैद्यकीय पथक नियमित कारवाई सुरू ठेवेल, असे सांगत नागरिकांनीसुद्धा अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र असणार्या डॉक्टरांकडे उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आयुक्त अनमोल सागर यांनी केले आहे.