BMC cleaning budget : मुंबईच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी दीड कोटींचे झाडू
मुंबई : स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला झाडू खरेदीसाठी दरवर्षी दीड कोटी खर्च करावे लागत आहेत. यात 3 लाख 17 हजार किलो झाडूच्या कांड्या (ब्रूम गोवा) लागत असून सुमारे 16 हजार 500 फुलझाडू (ब्रूम ग्रास) लागतात.
मुंबईच्या स्वच्छतेसाठी काही प्रमुख रस्त्यांवर यांत्रिकी झाडूंचा वापर केला जात असला तरी पारंपरिक झाडूंच्या सहाय्याने स्वच्छता केली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात फुलझाडू व कांड्या असलेल्या झाडू लागतात. महापालिका फुलझाडू नगाप्रमाणे विकत घेत असली तरी, काड्यांच्या झाडू बनवण्यासाठी किलोवर कांड्या विकत घेतल्या जातात. त्यानंतर या कांड्या बांधून त्याची झाडू बनवण्यात येते.
कांड्यांच्या झाडू बनवण्यासाठी 47.89 रुपये प्रति किलो कांड्या विकत घेतल्या जातात. यावर्षी 3 लाख 17 हजार 500 किलो कांड्यांसाठी 1 कोटी 52 लाख 5 हजार रुपये मोजण्यात येणार आहेत. एका फुलझाडूसाठी 59.20 रुपये मोजण्यात येणार असून 16 हजार 500 झाडूनसाठी 9 लाख 76 हजार 800 रुपये मोजले जाणार आहेत. अपेक्षित दरापेक्षा झाडूंचा दर 0.23 ते 7.5 टक्के कमी असून हा दर वर्षभर स्थिर राहणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.
फुलझाडू - 16,500 - प्रतिनग 59.20 रुपये, एकूण खर्च 9,76,800 रुपये
झाडूच्या कांड्या - 3,17,500 प्रति किलो 47.89 रुपये, एकूण खर्च 1,52,5,075 रुपये

