

डोंबिवली : गणपतीनंतर नवरात्रौत्सव संपला...आता दिवाळी सणाचे सार्यांना वेध लागले आहेत. तथापी सण असो वा उत्सव, बारमाही कल्याण-डोंबिवलीतील फूटपाथच नव्हे रस्तेही फेरीवाल्यांकडून गिळंकृत केलेले आढळून येतात. पूर्वेसह पश्चीम डोंबिवलीच्या स्टेशन परिसरातील चारही रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी केलेल्या आक्रमणामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ह प्रभाग वादाच्या भोवर्यात सापडला आहे. वाहनचालक आणि पादचार्यांसाठी रस्ते मोकळे केले नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देत रिक्षा चालक, मालक युनियनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
या संदर्भात रिक्षा युनियनने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या निवेदनावर शेखर जोशी, अंकुश म्हात्रे, उदय शेट्टी, कैलास यादव, सुरेश आंगणे, राजेंद्र गुप्ता, विश्वंभर दुबे आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत. रिक्षा युनियनने ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाला लक्ष केले आहे. केडीएमसीच्या ह प्रभाग क्षेत्रांतर्गत घनश्याम गुप्ते रोडला असलेल्या गोमांतक बेकरीपासून गोपी टॉकीज चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांच्या दुतर्फा विळखा पडला आहे.
या प्रभागाशी संबंधित फेरीवाला हटाव पथक प्रमुखांच्या कृपेमुळे या भागातील रस्त्यांच्या दुतर्फा ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांचे स्तोम दिवसागणिक माजत चालले आहे. आता हेच फेरीवाले फुटपाथ सोडून रस्त्याच्या मधोमध येण्यासाठी लक्ष्मी दर्शनाचा केडीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी लाभ घेत असल्याचा दाट संशय आल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
गेल्या 20 वर्षांपासून सफाई कामगार ते कनिष्ठ लिपिक पदापर्यंत पोहोचलेले विजय भोईर एकाच ठिकाणी ह प्रभाग क्षेत्रांतर्गत ठाण मांडून बसले आहेत. त्यातच फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सदर बाबत पडताळणी करण्यासाठी वाटल्यास आयुक्तांनी पश्चिम डोंबिवलीतील विशेषतः घनशाम गुप्ते रोडला सरप्राईज व्हिजीट अर्थात अचानक भेट देऊन पाहणी करावी, असे आवाहन रिक्षा चालक/मालक युनियनने सदर निवेदनाद्वारे केले आहे.
फेरीवाल्यांना अप्रत्यक्षरित्या चिथावणी
घनश्याम गुप्ते रोड अत्यंत अरूंद आहे. दुरार्फा फेरीवाले बसत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा तक्रारी करून सुद्धा काही उपयोग किंवा कार्यवाही होताना दिसत नाही. सदरचा रस्ता प्रचंड गर्दीचा असून अन्य वाहनांसह रिक्षांच्या वाहतुकीमुळे अनर्थ किंवा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण ? फेरीवाल्यांनी बसू नये किंवा त्यांनी पोट भरू नये, असा आमचा उद्देश नाही. मात्र शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, याची जबाबदारी रिक्षा चालकांप्रमाणे फेरीवाल्यांसह ह प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत असलेल्या फेरीवाला हटाव पथकाच्या प्रमुखांची देखिल आहे. त्यामुळे प्रथम या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करून शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथसह रस्तेही गिळंकृत करण्यास फेरीवाल्यांना अप्रत्यक्षरित्या चिथावणी देणार्या संबंधितांना सेवेतून निलंबित करावे.
जर या संदर्भात कडक कारवाई न झाल्यास येणारा दिवाळी सणाच्या तोंडावर ह प्रभाग कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देणार्या रिक्षा चालक/मालक युनियनने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल काय निर्णय घेतात ? याकडे डोंबिवलीकर रहिवासी, वाहन चालक, प्रवासी आणि पादचार्यांसह रिक्षावल्यांच्या नजरा लागल्या आहेत.