Crime News pudhari photo
ठाणे

Bhiwandi crime : बनावट नंबरप्लेट ला‍वणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा

हप्ते चुकवण्यासाठी चालकाने लढवली शक्कल

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : स्वतःच्या रिक्षाच्या कर्जाचे हप्ते थकल्याने रिक्षा खेचून नेली जाण्याच्या भीतीने आपल्या रिक्षाला दुसऱ्या रिक्षाचा बनावट नंबर वापरून व्यवसाय करणे एका रिक्षा चालकाच्या अंगलट आले असून वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत रिक्षा चालकाविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी पंढरीनाथ विशे हे मंगळवारी फिरदौस परिसरात कर्तव्य बजावत असताना एस टी स्टँडकडून वंजारपट्टी नाका या दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकाने आपल्या पुढील बाजूस ओव्हरसिट बसवून नेत असताना पोलीस कर्मचारी विशे यांनी त्या रिक्षांवर मोटार वाहन कायदा कलम २३९/१७७ नुसार चलन कारवाई केली.

परंतु या कारवाईचा मेसेज ठाण्यातील रिक्षाचालक हमीद मोहम्मद हुसेन शेख यांच्या मोबाईलवर आला. ते ठाण्यात असताना भिवंडीत कारवाई झाल्याच्या अचानक आलेल्या मेसेजमुळे हमीद शेख बुचकळ्यात पडले. त्यांनी ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाशी याबाबत संपर्क साधून तक्रार केली.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत याबाबत भिवंडी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद ओव्हाळ व भिवंडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खरात यांना कळवून सूचना देण्यात आल्या. त्यानंतर रिक्षाला वंजारपट्टी परिसरात शोधून रिक्षाचालक बजरंग फड रा. विश्वभारती फाटा कवाड यास ताब्यात घेऊन कल्याण नाका वाहतूक पोलीस ठाणे येथे घेऊन आले.

चौकशीत बजरंग फड याने आपल्या रिक्षाच्या खरा क्रमांक सांगत कर्जाचे हप्ते थकल्याने कर्ज वसूल करणारे रिक्षा जप्त करतील, या भीतीने खोटी नंबरप्लेट लावून रिक्षा चालवत असल्याचे कबूल केले. त्यानंतर वाहतूक पोलीस पंढरीनाथ विशे यांनी दिलेल्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT