ST bus depot demand File Photo
ठाणे

ST bus depot demand: भाईंदरमध्ये एसटी बसस्थानक लवकरात लवकर उभारा; परजिल्ह्यांतील एसटी पूर्ववत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांना पत्र

या जागेच्या काही भागामध्ये तिवर क्षेत्र निर्माण झाल्याने ती जागा ना विकास क्षेत्रात समाविष्ट झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर: मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याचा विचार करून भाईंदर पश्चिमेकडील नियोजित एसटी बस स्थानक लवकरात लवकर उभारण्यात यावा. तत्पूर्वी परजिल्ह्यांत जाणाऱ्या एसटी बसेस पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी नगरसेविका आभा पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

भाईंदर पश्चिमेकडील सर्व्हे क्रमांक 338 वरील 8.90 हेक्टर जागेत पालिकेच्या शहर विकास आराखड्यात एसटी डेपोसाठी आरक्षण क्रमांक 57 टाकण्यात आले आहे. सध्या या जागेचा ताबा राज्य महामार्ग परिवहन महामंडळाकडे आहे. मात्र, या जागेच्या काही भागामध्ये तिवर क्षेत्र निर्माण झाल्याने ती जागा ना विकास क्षेत्रात समाविष्ट झाली आहे.

तर उर्वरित जागेत विकास होणे शक्य असल्याने त्या जागेत एसटी डेपो ऐवजी बस स्थानक सुरू करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी बहुद्देशीय इमारतीचे भूमिपूजन परिवहन मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर या जागेत नियोजित एसटी बस स्थानक वा डेपो कामाला सुरुवात झालेली नाही.

यामुळे परजिल्ह्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. यामुळे येथील प्रवाशांना ठाणे, बोरिवली, परळ व मुंबई सेंट्रल येथे जावे लागते. सध्या भाईंदर प. रेल्वे स्थानकाबाहेर एसटी थांबा आहे. या बस रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे नियोजित स्थानक सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

प्रवाशांना दिलासा द्यावा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रत्नागिरी येथील नाटे, कोल्हापूर मार्गावर एसटी बस सुरू केल्या. याखेरीज पूर्वी दापोली, चोपडा, कवठे महांकाळ, चिपळूण, श्रीवर्धन, पुणे स्वारगेट, चंदगड, तुळजापूर, नाशिक, सोलापूर आदी ठिकाणी जाण्याकरिता एसटी बस सेवा सुरू करण्यात आली होती. या मार्गावर पूर्वीप्रमाणेच एसटी सेवा सुरू करून स्थानिक प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी आभा पाटील यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT