

बजरंग वाळुंज
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील फेज 1 आणि 2 पट्ट्यात असलेल्या रासायनिक कारखान्यांतून पाणी आणि वायूच्या प्रदूषणात आता खंड पडू लागला असल्याचा प्रत्यय निसर्गाच्या अविष्कारातून दिसू लागला आहे. निवासी विभागातील मिलापनगर सद्या मिनी कोकण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
या भागातील बहुसंख्य बंगल्यांच्या आवारात रहिवाशांनी पूर्वी आंबे, फणस, चिकू, केळी, नारळ आदींसारख्या कोकणातील झाडांचे रोपण केले आहे. अशा फळझाडांसह फणसांनी बहरलेल्या झाडांनी तर डोंबिवलीतील प्रदूषण आटोक्यात आणल्याचा धडधडीत पुरावा दिला आहे.
आंबा आणि नारळ ही झाडे कोकणासह सर्वच ठिकाणी पाहण्यास मिळतात. तथापि फणसाची झाडे मात्र आपल्या येथे सर्वसाधारणपणे फार कमी पाहण्यात येतात. त्यात डोंबिवली एमआयडीसीच्या प्रदूषणकारी हवामानात झाडांवर अशी फणसासारखी फळे जास्त येत नसल्याचे यापूर्वीच्या अनुभवावरून दिसत होते. सद्या एमआयडीसीमधील प्रदूषण काहीसे कमी झाले आहे.
याचा चांगला परिणाम फळझाडांवरून दिसून येत आहे. मिलापनगरमध्ये काही बंगल्यांच्या आवारातील झाडांना फणस लागल्याचे दृष्टीपथात येत आहे. या भागातील रश्मी विचारे, वसंत छेडा, राजू सुर्वे, वल्लभ आठवले यांच्यासह अनेक रहिवाशांच्या बंगल्यांच्या आवारात फणसांची झाडे फळांनी बहरली असून आता येत्या काही दिवसांतच हे फणस पिकतील.
फणसामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत तर मिळतेच, शिवाय मधुमेह देखील नियंत्रित होतो. त्यामुळे आरोग्यासाठी फणसाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. जून महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमा सणाला फणसाला अनन्य साधारण महत्व असते. या सणाच्या दरम्यान जागोजागी फणस विकणारे दिसतात.
मात्र यावेळी मिलापनगरवासियांना फणस विकत घ्यावे लागणार नाही असे दिसते. जेव्हा फणसाचे फळ छोटे आणि कच्चे असते तेव्हा काहीजण त्याची चविष्ट भाजी बनवितात.ज्यांच्या आवारात केळीची झाडे आहेत. त्यातील केळफुलांची भाजी बनवून त्याचा आस्वाद घेत असतात.
पर्यावरणासाठी सुखदायक घटना
फणसाबरोबर आंबे, नारळ, पेरू, चिकू, केळी, पपई, जांभूळ, जाम, इत्यादी फळेही मिलापनगरमधील झाडांवर मोठ्या प्रमाणात लागल्याचे दिसत आहेत. पोपट, साळुंकी, भारद्वाज, बुलबुल, वटवट्या, कस्तुर, दयाळ, कोकीळ, नाचण, तांबट, फूलचुख्या, आदी पक्षांसह फुलपाखरांचाही या परिसरात राबता वाढला आहे.
सद्या अतिशय उकाडा वाढला आहे. पर्यावरणाचा असमतोलपणा असतानाही अशी छान छान फळे झाडांना लागणे आणि त्यांच्यावर पक्ष्यांचा वावर वाढणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने सुखद घटना असल्याची प्रतिक्रिया या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.