Bhayandar Ghodbunder Road Project Pudhari
ठाणे

Bhayandar Ghodbunder Road Project: गायमुख ते भाईंदर प्रवास होणार सुपरफास्ट

प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; १५.४४ किमीच्या प्रकल्पाचा खर्च १७ हजार ३६ कोटी

पुढारी वृत्तसेवा

राजू काळे

भाईंदर: राज्य शासनाने भाईंदर ते ठाणे दरम्यानच्या प्रवासाला गती देण्यासाठी भाईंदर ते घोडबंदर मार्गावरील गायमुख दरम्यान नवीन मार्ग बांधण्याच्या कामास २२ जून रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत भाईंदर ते फाऊंटन हॉटेल दरम्यान भाईंदर खाडीमार्गे उन्नत मार्ग तर फाऊंटन हॉटेल ते गायमुख दरम्यान भुयारी मार्ग बांधण्यात येणार असून या एकूण १५.४४ किलो मीटर अंतराच्या मार्गासाठी एकूण १७ हजार ३६ कोटी ३० लाख रुपये खर्च येणार आहे.

राज्य शासनाने बोरिवली ते ठाणे दरम्यान भुयारी जलद मार्गाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर मिरा-भाईंदरमधील प्रवाशांना भाईंदर ते ठाणे दरम्यानच्या जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकल्पांतर्गत भाईंदर ते गायमुख दरम्यान नवीन वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असून गायमुख ते ठाणे दरम्यानच्या वाहतुकीसाठी तेथील उड्डाणपूल तसेच रुंद रस्त्यावरून वाहतूकीला गती दिली जाणार आहे.

मुंबईहून ठाणे येथे प्रवास करणाऱ्या वाहनांना तेथील भुयारी मार्गाचा वापर करता येणार असल्याने बोरिवली ते दहिसर चेकनाका मार्गे ठाणे येथे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे फाऊंटन ते ठाणे दरम्यानच्या प्रवासाला रस्ता मोकळा राहणार असल्याचा दावा केला जात आहे.

भाईंदर ते ठाणे दरम्यानच्या वाहतुकीला गती देण्यासाठी राज्य शासनाने भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शान पर्यंत ९.५८ किमी अंतराचा उन्नत खाडी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे फाऊंटन ते गायमुख दरम्यान ५.८६ किमीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या एकूण १५.४४ किमीच्या अंतरासाठी तब्बल १७ हजार ३६ कोटी ३० लाख रुपये खर्च येणार आहे.

या खर्चासह प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास २२ जून रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता दिल्याने भाईंदर ते ठाणे दरम्यानचा प्रवास सुसाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हा प्रकल्प पूर्ण होण्यास ५ वर्षांचा कालावधी लागणार असून तो बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) तत्वावर साकारण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी-व्यवहार्यता अंतर निधी (पीपीपी-व्हीजीएफ(व्हाएबल गॅप फंडिंग) सहभागाने प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के व्यवहार्यता अंतर निधी (व्हीजीएफ) अंतर्गत ज्यामध्ये २० टक्के निधी केंद्र सरकारकडून तर २० टक्के निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होणार आहे.

हा प्रकल्प एमएमआरडीए मार्फत साकारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी एमएमआरडीएलाच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

१ तासाचा प्रवास काही मिनिटांवर येणार

या प्रकल्पासाठी सुमारे ५७.३६ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार असून या भूसंपादनाची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पामधील बाधितांचे एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरकुल योजनेतील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे अन्यथा त्यांना एकरकमी मोबदला दिला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम एमएमआरडीएकडून राज्य शासनाला १५ दिवसांत सादर करावा लागणार आहे. हा मार्ग साकारल्यास किमान भाईंदर ते गायमुख दरम्यानचा प्रवास काही मिनिटांवर येणार असून सध्या या प्रवासासाठी किमान पाऊण ते एक तासाचा कालावधी लागतो.

त्यातच या मार्गावर वाहतूक कोंडी उद्भवल्यास प्रवासाला अमर्याद कालावधी लागतो. यातून प्रवाशांची सुटका होऊन त्यांचा ठाण्याच्या दिशेकडील प्रवास सुसाट होणार आहे. मात्र त्यासाठी वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT