Thane News Pudhari
ठाणे

Thane News: हातावर गोंदवलेल्या नावाने २४ वर्षांनी जुळले नात्याचे धागे!

आठ वर्षांचा शोध, मतदार यादीचा धागा अन् व्हिडीओ कॉलवर अश्रूंनी भरलेली भावंडांची भेट; ठाणे पोलिसांची माणुसकी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: लहानपणी कुटुंबापासून दुरावलेल्या भारती अश्रू कदम यांची तब्बल २४ वर्षांनंतर आपल्या भावंडांशी भेट घडून आली. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या कुटुंबशोधाला ठाणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश मिळाले. जुन्या मतदार यादीतील नोंदी आणि हातावर गोंदवलेल्या नावामुळे भारती यांना आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचता आले.

२००२ मध्ये भारती या नवी मुंबईतील मामाच्या घरी जात असताना वाट चुकल्या होत्या. त्यावेळी बेलापूर पोलिसांना त्या सापडल्या; मात्र त्यांच्या कुटुंबीयांचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांची रवानगी बालगृहात करण्यात आली.

पुढे त्यांचे लग्न झाले आणि त्यांना दोन मुले झाली. संसार सुरू झाल्यानंतरही आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती. त्यासाठी त्यांनी गेली आठ वर्षे सातत्याने प्रयत्न केले. अखेर ८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी ठाणे पोलिसांकडे मदतीची विनंती केली.

ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. भारती यांच्या भूतकाळाची माहिती मिळवण्यासाठी २००२ मधील जुन्या मतदार याद्या तपासण्यात आल्या. या शोधादरम्यान त्यांच्या भावाच्या नावाची नोंद मिळाली.

त्याआधारे पोलिसांनी भाऊ प्रकाश, विजय आणि बहीण शालिनी यांच्याशी संपर्क साधला. भारती यांच्या हातावर गोंदवलेले ‘भारती अश्रू कदम’ हे नाव त्यांच्या ओळखीची खात्री पटवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरले.

त्यानंतर पोलिसांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून भारती आणि त्यांच्या भावंडांची भेट घडवून आणली. तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांना पाहताना भावंडांचे डोळे अश्रूंनी भरून आले. हरवलेल्या नात्यांचे धागे पुन्हा जोडले गेल्याने भारती यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आनंद झाला.

या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक वासंती शिंदे, पोलीस हवालदार तानाजी गायकवाड, महिला पोलीस नाईक तेजश्री शिरसाठ आणि पोलीस शिपाई सुवर्णा यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कुटुंबाशी पुनर्भेट घडवून आणल्याबद्दल भारती आणि त्यांच्या भावंडांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT