Child sexual abuse case pudhari photo
ठाणे

Child sexual abuse case : बदलापूर पुन्हा हादरले

चार वर्षीय चिमुरडीवर नराधम स्कूल बसचालकाचा व्हॅनमध्ये अत्याचार

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : कथित आदर्श शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाने चर्चेत आलेले आणि संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमुळे अपकीर्ती पदरी पडलेले बदलापूर गुरुवारी पुन्हा हादरले. बदलापूर पश्चिमेकडील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये एका चार वर्षीय बालिकेवर स्कूल बसमध्येच चालकाने अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने संतापाची लाट उसळली असून, बदलापूरच्या आणखी एका शाळेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पस्तीस वर्षीय स्कूल बसचालकाला बदलापूर पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शिकणारी मुलगी गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. मात्र घरी यायला उशीर झाल्याने आईने स्कूल बस चालकाला फोन केले. मात्र त्याने एकही फोन उचलला नाही.

तब्बल पाऊण तास मुलगी उशिरा घरी पोहोचली तेव्हा ती प्रचंड घाबरलेली होती. आईने व शेजाऱ्यांनी तिला विश्वासात घेत काय घडले ते विचारले तेव्हा तिने सारा प्रकार सांगितला. तो ऐकून संतप्त पालकांनी शाळेत धाव घेतली. मुख्याध्यापकांना गाठले. मात्र, मुख्याध्यापकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परिणामी, या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी स्कूलबस चालकाला ताब्यात घेतले.

अत्याचार झालेली स्कूल व्हॅन पोलीस ठाण्यात जमा केली जात असताना संतप्त पालकांनी व नागरिकांनी दगडफेक करून ही बस फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून अनर्थ रोखला. विशेष म्हणजे या प्रकरणालाही जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी संगीता चेंदवणकर यांनाच पुढाकार घ्यावा लागला. यापूर्वी बदलापुरात झालेल्या दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातही आंदोलनाचं नेतृत्व त्यांनीच केले होते. यापूर्वीची प्रकरणे समोर असताना आणि आदर्श प्रकरणात अक्षय शिंदेचा संशयास्पद एन्काऊंटर झाल्यानंतरही पुन्हा असा प्रकार घडल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

स्कूल व्हॅन बेकायदेशीर

गुरुवारी प्री-प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाला ती स्कूल व्हॅन अवैधरित्या चालवली जात आहे. या स्कूलबसला आरटीओेचा परवानाच नाही. या स्कूल बसमध्ये नियमानुसार महिला अटेंडंट नव्हती. या साऱ्या प्रकारास शाळा प्रशासनही तितकेच जबाबदार असून, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

  • बदलापूर शहरात ऑगस्ट 2024 मध्ये आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरकर पेटून रस्त्यावर उतरले होते व त्यातून एक मोठे जनआंदोलन उभे झाले होते.

  • त्याहीआधी 2013 मध्ये बदलापुरातच स्कूल बसमध्ये झालेल्या अत्याचाराने संताप उसळला होता.

  • आता 2026 च्या पहिल्याच महिन्यात चिमुरडी अत्याचाराची शिकार झाल्याने बदलापूर संतापाने अक्षरश: धुमसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT