बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचनेत काही किरकोळ बदल करून अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे.
ऑगस्ट महिन्यात कुळगांव बदलापूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर सूचना व हरकती मागणी करण्यात आल्या होत्या. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात 88 हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी पार पडल्यानंतर कोकण आयुक्तांनी नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे.
प्रभाग रचनांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी प्रगणक गटाची अदलाबदल करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रभागातील लोकसंख्या घटली आहे, तर काही प्रभागात संख्या वाढली आहे. काही प्रभागांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. बदलापुरात प्रभागांच्या मुख्य सीमांमध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात पश्चिमेतील प्रभाग 1, 3 आणि 4 मधील काही मुख्य सीमा बदलण्यात आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 18 चा भाग 21मध्ये, प्रभाग क्रमांक 16 आणि 19 चा भाग 17 मध्ये जोडण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 1, 2, 4, 5, 8, 12, 15, 16, 20, 21 आणि 23 ची लोकसंख्या वाढली आहे. तर प्रभाग क्रमांक 3, 6, 7, 13, 17, 18, 19, 22 या प्रभागात लोकसंख्या घटली आहे. तर प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 14, 24 मध्ये कोणत्याही प्रकारे बदल झालेले नाहीत.