Badlapur Municipal Council Tushar Apte Resignation
बदलापूर : बदलापुरातील एका शाळेतील लैंगिक अत्याचारातील पोस्को सारख्या गंभीर गुन्हातील सहआरोपी तुषार आपटे याला भारतीय जनता पक्षाने कुळगांव बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत सदस्य पद बहाल केले होते. त्या विरोधात बदलापूर मध्ये संतापाची लाट पसरली होती. मनसेने या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तर शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला होता.
बदलापुरातूनही या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त करत चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर तुषार आपटे याने बदलापूर नगरपालिकेत सुट्टी असुनही राजीनामा दिला. तुषार आपटे याला कोणाच्या मर्जीवरून स्वीकृत सदस्य पद देण्यात आले. त्याच्यासाठी भाजपत कोणी शब्द टाकला, यावरून आता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपात राजकारण सुरू झाले आहे. मात्र, याबाबत बोलायला कोणीही तयार नाही.
आपटे याने चार नगरसेवक निवडून आणले म्हणून त्याला नगरसेवक पद देण्यात आले, असे भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आपटे याचे बदलापुरात कोणतंही राजकीय अस्तित्व नसून त्याची वहिनी दहा वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीत भाजपा कडून उमेदवारी मागत होती. मात्र, त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली होती. तसेच अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर त्याचाही दारुण पराभव झाला होता.
आपटे याचे कोणतेही राजकीय, सामाजिक काम नव्हते. तसेच पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात निवडणुकीत कधीही सहभागी झाला नव्हता. त्यामुळे त्याच्यामुळे चार नगरसेवक निवडून येण्याचा प्रश्नच नाही, असा सूर भाजपतील एका गटातून उमटत आहे. तर आपटे हा नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आणि भाजपचे नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांचा नातेवाईक असल्यानेच त्याला हे नगरसेवक पद बहाल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आता आपटे याला कोणाच्या मर्जीवरून स्वीकृत नगरसेवक पद बहाल केले, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार का ? असा सवाल बदलापूरकर विचारात आहेत. आपटे याचा भाजपशी कोणताही तात्विक संबंध किंवा पक्षात कोणतेही काम नसतानाही त्याच्या कोणत्या गुणांना पारखून भाजपने त्यांना स्वीकृत सदस्य पद दिलं आणि प्रसार माध्यमातून आणि शहरातील नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर राजीनामा देण्याची पक्षावर नामुष्की आली. याबाबत भाजपाचे वरिष्ठ काय निर्णय घेतात ? याकडे आता बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षांनी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळेस शिवसेना- भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपटे यांची निवड झाल्यानंतर बदलापूर नगरपालिका सभागृहातील विरोधात असलेल्या शिवसेनेतील एकाही सदस्यांनी या विरोधात ब्र ही काढला नाही.
तसेच अत्याचार विरोधातील आंदोलनात सहभाग घेणाऱ्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्यावर या प्रकरणात आंदोलनात सहभागी झाल्या म्हणून गुन्हा ही दाखल आहे. मात्र त्यांनीही या निवडीला विरोध केला नाही. त्यामुळे बदलापुरातील राजकीय पक्षांची अशी कोणती अपरिहार्यता होती ? की त्यांनी आपटे सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला हे पद बहाल केलं. असा सवाल आता बदलापुरातून उपस्थित होत आहे.