Badlapur Snake Murder Case Wife Killed By Husband: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर जवळपास तीन वर्षांनी पोलिसांनी तिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतीसह चार जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर पतीनेच मित्रांच्या मदतीने रचलेला कट होता.
पोलिसांना 10 जुलै 2022 रोजी बदलापूरमधील उज्ज्वलदीप सोसायटीच्या एका घरात नीरजा रूपेश आंबेकरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीच्या तपासात कोणताही संशय आला नाही, परंतु नंतर काही साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास दिसून आला, ज्यामुळे पोलिसांना पुन्हा तपास सुरू करावा लागला आणि हळूहळू संपूर्ण कटाचे धागेदोरे जुळत गेले.
तपासात उघड झाले की नीरजा आणि त्यांचे पती रूपेश आंबेकर यांच्यात सतत वाद सुरू होते. या संघर्षांमुळे त्याने तिला संपवण्याचा कट रचला. या कटामध्ये त्याचे दोन मित्र ऋषिकेश रमेश चालके आणि कुणाल विश्वनाथ चौधरी हेही सहभागी होते.
रूपेश आणि त्याच्या मित्रांनी चेतन विजय दुधाने नावाच्या स्नेक रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्याच्याकडून विषारी साप आणण्यात आला. या सापाचाच उपयोग करून नीरजाची हत्या करण्यात आली. सापाच्या चाव्यामुळे मृत्यू झाल्यास तो अपघात म्हणून गृहित धरला जाईल, आणि पोलिसांना शंका येणार नाही, असा आरोपींना विश्वास होता.
मात्र पोलिसांच्या तपासामुळे गूढ उकलले. आता, तीन वर्षांनंतर, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि चारही आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की तपास सुरू आहे आणि सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.