

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या खासदारांची आढावा बैठक घेतली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पक्षाच्या कामगिरीचा आढावा यावेळी घेण्यात आला. संसद भवनाच्या विस्तारित इमारतीत ही बैठक पार पडली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस खासदारांनी बजावलेल्या भूमिकेचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. प्रियांका गांधी यांच्या भाषणाचे विशेष कौतुक त्यांनी केले. शशी थरूर या बैठकीला अनुपस्थित होते. तसेच खासदार मनीष तिवारी देखील या बैठकीला उपस्थिती नसल्याचे समजते.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला निवडणूक सुधारणांवर चर्चा घ्यावी लागली, हे काँग्रेसचे यश आहे. यावेळी एसआयआरवर चर्चा झाली, असे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रियांका गांधी यांनी खूप चांगले भाषण दिले. मी हे माझी बहीण आहे म्हणून बोलत नाही, मी हे बाहेरून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे बोलत आहे, असे त्यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, काँग्रेसचे लोकसभेतील प्रतोद मणिकम टागोर यांच्यासह पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार उपस्थित होते. पक्षाच्या महाराष्ट्रातील खासदारांनी देखील बैठकीला हजेरी लावली होती.
शशी थरूर यांची अनुपस्थिती
काँग्रेसचे खासदार शशी थरूर पक्षापासून अंतर ठेवत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अशातच त्यांनी पक्षाच्या खासदारांच्या बैठकीला उपस्थिती लावली नाही. त्यामुळे देखील राजकीय तर्क लावले जात आहेत. शशी थरूर लोकसभेत देखील उपस्थित नव्हते. दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला देखील थरुर अनुपस्थित होते.