Dombivli Rickshaw Drivers Pothole Protest
डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या रिक्षाचालकांनी मंगळवारी (दि.२१) दुपारी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोखे आंदोलन केले.
रेतीबंदर रोडवरील दोन पाण्याच्या टाकीजवळील मोठ्या खड्ड्यांना फुले वाहून, आरती करून आणि हात जोडून प्रार्थना करत रिक्षाचालकांनी केडीएमसीचा निषेध नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रिक्षा युनियनचे पदाधिकारी भगवान मोरजकर, शेखर जोशी, राजा चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक आंदोलनात सहभागी झाले होते. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत रिक्षाचालकांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने केली, निवेदने दिली आणि तक्रारी केल्या. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली. प्रत्यक्षात रस्त्यांची दुरूस्ती न झाल्याने वाहनचालक, पादचारी आणि पश्चिम डोंबिवलीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने रिक्षाचालकांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची विधिवत पूजा करून आंदोलन केले.
या वेळी रिक्षाचालक युनियनचे पदाधिकारी भगवान मोरजकर म्हणाले, महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही या खड्ड्यांनाच हात जोडून प्रार्थना केली की आमच्या वाहनांसह पादचारी आणि रहिवाशांचा अपघात होऊ देऊ नका. प्रशासनाने जबाबदारी पार पाडली नाही तरी या खड्ड्यांनी तरी आमचे रक्षण करावे. तर पदाधिकारी शेखर जोशी यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, पश्चिम डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवले नाहीत तर सर्व रिक्षाचालकांच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल.
चालकांसह वाहनांच्या व्यथा
डोंबिवली पश्चिमेतील अनेक डांबरी रस्त्यांवर सध्या मोठे खड्डे पडले आहेत. दररोज रिक्षाचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक चालकांना पाठदुखी, मणक्याचे विकार आणि इतर शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. तसेच रिक्षांच्या सस्पेन्शन, टायर आणि इतर सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची व्यथा चालकांनी मांडली. रिक्षाचालकांनी महापालिका प्रशासनाला आठवड्याचा अल्टिमेटम देत रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण पश्चिम डोंबिवली परिसरात व्यापक चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.