Dombivli News | रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर प्रकटले फणा काढून नागराज : डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची पळापळ!

तिकीट काउंटरचे कामकाज तात्पुरते विस्कळीत : सर्पमित्रांनी केले नागला रेस्क्यू
Dombivli News | रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर प्रकटले फणा काढून नागराज : डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची पळापळ!
Published on
Updated on

डोंबिवली : मध्य रेल्वेवरील अत्यंत वर्दळीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात शनिवारी धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. स्थानकातील पूर्व बाजूला असलेल्या तिकीट काऊंटरवर थेट एक भला मोठा नाग फणा काढून बसल्याचे आढळून आले. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे तिकीट काढण्यासाठी उभे असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला, तर तिकीट खिडकीतील रेल्वे कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच पळापळ झाली.

    या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडे रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर नेहमीप्रमाणे प्रवासी लोकलचे तिकीट आणि पास काढण्यासाठी रांगेत उभे होते. त्याच वेळी काऊंटरच्या आतील भागात अचानक एक मोठा नाग सरपटत आला आणि थेट काऊंटरवर फणा काढून बसला. खिडकीच्या काचेजवळ थेट विषारी नाग आल्याचे पाहताच तिकीट देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी तात्काळ तेथून सुरक्षित ठिकाणी पळ काढला.

     तिकीट काऊंटरवर नागोबा प्रकटल्याची बातमी स्टेशन परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या नागराजाला पाहण्यासाठी प्रवाशांनी तिकीट काऊंटरच्या बाहेर एकच गर्दी केली होती. अनेक प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.

ऐन प्रवासाच्या वेळी तिकीट काऊंटर बंद झाल्याने आणि समोरच नागराज असल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ​घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तात्काळ स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिकीट काउंटरचे कामकाज तात्पुरते विस्कळीत झाले होते. सर्पमित्रांनी नागराजांना पकडून पिशवीत जेरबंद केल्याचे पाहून उपस्थित साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news