ठाणे : क्षेपण भूमी अर्थात डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेला भिवंडी तालुक्यातील आतकोली गावात ८३ एकरचा भूखंड देण्यात आला आहे. मात्र, या भूखंडावर दगड खाणी तयार करून कोट्यवधींचा महसूल दगड माफियांनी बुडविला आहे. ठामपाच्या घनकचरा विभागाने या दगडचोरीला का अभय दिले आहे? या दगडचोरीत ठामपाचे अधिकारी सहभागी आहेत का? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केले आहेत.
भिवंडीतील आतकोली येथील ३४ हेक्टर क्षेत्र राज्य शासनाने ठाणे महापालिकेस प्रदान केले आहे. या भूखंडावर ठाणे महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाच्या पूर्व तयारीचे काम सुरू आहे. एकीकडे ठामपाच्या मालकीचे डम्पिंग ग्राऊंड असतानाही दिवा परिसरात कचरा टाकला जात असल्याने आतकोली येथे पाहणी करण्यासाठी मनोज प्रधान गेले होते. त्यावेळी या भागात चक्क दगडखाणी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले.
या ठिकाणी बेकायदेशीरपणे दगडखाणी सुरू केल्याची तक्रार ठामपाने १० जानेवारी २०२५ रोजी पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, ही तक्रार दाखल करतानाही ठामपाच्या घनकचरा विभागाने चलाखी केली होती. वास्तविक, ही तक्रार जिल्हा प्रशासना कडे करण्याऐवजी ती पडघा पोलीस ठाण्यात केली होती.
ठामपा अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर दगडखाण सुरू असताना त्यावेळी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करून ठामपाने कोणाला वाचविले होते, असा सवाल करीत प्रधान म्हणाले की, आतकोली येथील ३४ हेक्टरची ही जागा सन २०२४ मध्ये ठामपाच्या ताब्यात आली आहे. ८४.२ एकरच्या या भूखंडावर आजही दगडखाण सुरू आहे. गेल्या काही महिन्यात अंदाजे ३० फूट खोदकाम केले आहे.
याचे गणित बांधल्यास एकरामागे किमान ४.५ कोटी ब्रास दगड चोरण्यात आला असावा, त्याची हजारो कोटींची राॅयल्टी सरकार दरबारी जमाच केलेली नाही. जर, ठामपाने या जागेचा दगडखाणीसाठी रितसर लिलाव केला असता तर ठामपाच्या गंगाजळीत किमान १२ हजार कोटींची भर पडली असती. मात्र, ठामपाच्या घनकचरा विभागाने चोरांच्या हातात चक्क तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत, असेही प्रधान म्हणाले.
दरम्यान, आपण येथे भेट दिली असता येथे एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. तर, दगडखाण ठाणे महानगर पालिकेच्या जागेतील नाहीत, असे सांगत असतानाच ती जागा आपलीच आहे, असेही एक मजूर सांगत होता. मात्र, येथे कचरा टाकून झाल्यानंतर रिकाम्या डंपरमधून माती आणि खडी भरून त्यांचे वहन केले जात असल्याचेही दिसून आले. ठाणे महानगरपालिकेने कार्यादेश क्रमांक ५७७ अन्वये, अँटनी लारा एन्वायरो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला ₹३२९.४५ कोटींचे कंत्राट दिले आहे.
ही कंपनी प्रतिदिन ६०० ते ८०० टन कचरा विलगीकरण करणार, असे ठामपाकडून सांगितले होते. मात्र, या ठिकाणी फक्त कचरा फेकून दिला जात असून प्लास्टीक, कागद, काच किंवा ओला कचरा विलगीकरणासाठी मानवी अथवा यांत्रिकी व्यवस्थाच नसल्याचे दिसून आले.
गाड्या परत पाठविणारे ते कोण
या ठिकाणी कचरा भरलेल्या गाड्या डम्पिंग ग्राऊंडवर येत होत्या. मात्र, गोदामांसाठी तयार केलेल्या रस्त्यावरून रिकामे डंपर डम्पिंग ग्राऊंडच्या दिशेने येत होते. आपण या रस्त्यावर आल्यानंतर एक इसम या ठिकाणी या डंपर चालकांना परत जाण्यासाठी हातवारे करीत असताना दिसून आला. हा इसम कोण होता आणि तो आपण पाहणी करीत असताना रिकामे डंपर का परत पाठवत होता, यामागील कारणे नक्कीच संशयास्पद होती, असेही मनोज प्रधान म्हणाले.