Dombivli water shortage : बारवी धरण फुल्ल होऊनही डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई

बारवी धरण फुल्ल होऊनही डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई
Dombivli water shortage
Dombivli water shortagepudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या प्रभाग क्रमांक २७ मधील पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर, अंबिकानगर आणि प्रभाग क्रमांक १९ मधील सांगर्ली, एमआयडीसी, आजदेगाव, इंदिरानगर व खंबाळपाडा परिसरात गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

बारवी धरण फुल्ल होऊनही डोंबिवलीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने सत्ताधारी भाजपाने बुधवारी पाणीबाणी मोर्चा काढून केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट म्हणून चमचे देऊन निषेध व्यक्त केला.

Dombivli water shortage
Thane politics : कल्याण फाट्याच्या सिग्नलवरून युतीतच ‘श्रेय’चा सिग्नल

केडीएमसीच्या डोंबिवली परिमंडळ २ च्या बालाजी आंगण कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका मंदा पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, पूजा पाटील, साई शेलार, अभिजीत थरवळ, विनोद काळण, ॲड. मंदार टावरे, प्रभाग प्रभारी ॲड. मनोज घरत, संजय राणे, संजय विचारे, मिहीर दवते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या पंधरा वर्षांत या परिसरात इतकी मोठी पाणीटंचाई कधीच नव्हती, असा दावा या भागातील रहिवासी करत आहेत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार वर्गाला रोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही कल्याण-डोंबिवलीकरांच्या नळाला पाण्याचा थेंबही येत नाही, तर दुसरीकडे खासगी टँकरने मात्र पाणी मिळते, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रश्नावर भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत पत्रव्यवहार केला होता. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जलवाहिन्या तपासण्याची मागणी केली होती. गोग्रासवाडी परिसरात तांत्रिक तपासणी केली, तरीही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. आजही अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी संतप्त आहेत. बुधवारी काढलेल्या मोर्चात गृहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Dombivli water shortage
Mumbai extortion case : वांद्र्यात पुनर्विकास सुरू ठेवण्यासाठी मागितली ११ कोटींची खंडणी; २५ लाख घेताना ५ अटकेत

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची भाजपाने मागणी केली. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव सण तोंडावर असताना पाणीटंचाई कायम राहिली तर यापेक्षा अधिक तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

प्रतीकात्मक निषेध

पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर, अंबिकानगर, सांगर्ली, एमआयडीसी, आजदेगाव, इंदिरानगर, खंबाळपाडा परिसरातील काही इमारतींना चमचाभरही पाणी मिळत नसल्याने संतापाचे प्रतीक म्हणून आंदोलनकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना उपरोधिकपणे चमचे भेट देऊन निषेध व्यक्त केला. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, निदान चमचाभर तरी द्या, असा टोला यावेळी लगावण्यात आला.

पाण्यासाठी रहिवाशांचा टाहो

विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा सत्ताधारी पक्षात आहे. सत्ताधारी पक्षाच्याच प्रभागात पाण्यासाठी रहिवाशांना टाहो फोडावा लागत आहे. अखेर सत्ताधारी पक्षालाच स्वतःच्या सत्तेविरोधात रस्त्यावर उतरून मोर्चा काढावा लागत आहे. यावरून महानगरपालिका प्रशासनाचा कारभार दिसून येत असल्याची कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news